राजिंदर खन्ना ‘रॉ’चे प्रमुख
By Admin | Published: December 21, 2014 01:38 AM2014-12-21T01:38:41+5:302014-12-21T01:38:41+5:30
भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या प्रमुखपदी विभागाचे विशेष सचिव राजिंदर खन्ना यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या प्रमुखपदी विभागाचे विशेष सचिव राजिंदर खन्ना यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) म्हणून कार्यरत असलेल्या प्रकाश मिश्रा यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे.
‘रॉ’ अर्थात रिसर्च अँड अॅनालिसिस विंग ही भारताची देशाबाहेरील गोपनीय माहिती गोळा करणारी संस्था असून सीआरपीएफ हे जगातील सर्वांत मोठे निमलष्करी दल आहे. सीआरपीएफकडे सुमारे तीन लाख जवान आहेत.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीने खन्ना यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे. ते येत्या ३१ डिसेंबर रोजी आलोक जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. खन्ना हे ‘रॉ’च्या दहशतवादविरोधी विभागाचे जनक म्हणून ओळखले जातात. जगभरातील गुप्तहेर संस्थांचे सहकार्य घेण्याकामी ते अग्रणी असत. (लोकमत न्यूज नेटवर्क)