रजनीकांत सक्रिय राजकारणात, ३१ डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: December 3, 2020 01:23 PM2020-12-03T13:23:26+5:302020-12-03T13:25:42+5:30
Rajinikanth News : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.
चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आज एक ट्विट करत ही घोषणा केली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. रजनीकांत यांनीही सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची घोषणा करत पक्षाच्या घोषणेची तारीखही जाहीर केली आहे.
A political party will be launched in January; Announcement regarding it will be made on December 31st, tweets actor Rajinikanth pic.twitter.com/K2MikOk30I
— ANI (@ANI) December 3, 2020
रजनीकांत हे गेल्या दोन वर्षांपासून तामिळनाडूमधील राजकीय मुद्द्यांवर सक्रिय झालेले आहेत. मात्र आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केलेला नव्हता. गेल्या वर्षी दक्षिणेतील अजून एक सुपरस्टार कमल हसन यांनी रजनीकांत यांच्यासोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांच्याही पक्षात आघाडी होण्याचे वृत्त समोर आले होते.
रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या घोषणेने तामिळनाडूतील राजकारणात भूकंप घडून येण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये सध्या सत्ताधारी अण्णा द्रमुक भाजपाच्या मदतीने राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच केंद्रातील सत्ताधारी भाजपाही तामिळनाडूमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रजनीकांत यांनाही आपल्याकडे ओढण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र अमित शाहांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान दोघांचीही भेट होऊ शकली नव्हती.