रजनीकांत घेऊ शकतात मोदींची भेट! तामिळनाडूच्या राजकारणात रंगत
By admin | Published: May 21, 2017 04:40 PM2017-05-21T16:40:06+5:302017-05-21T16:40:06+5:30
राज्यव्यापी लोकप्रियता असलेल्या नेतृत्वाची तामिळनाडूमध्ये वानवा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 21 - तामिळनाडूच्या राजकारणात सध्या नव्या बदलाचे वारे वाहत आहेत. जयललितांचा आकस्मिक मृत्यू आणि एम. करुणांनिधींच्या वार्धक्यामुळे राज्यव्यापी लोकप्रियता असलेल्या नेतृत्वाची तामिळनाडूमध्ये वानवा निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यातच रजनीकांत यांनी स्वत: ही आपली पावले राजकारणाच्या दिशेने वळवण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची वदंता आहे.
रजनीकांत यांच्या दक्षिणेतील कमालीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे भाकीत वारंवार वर्तवण्यात येत असते. दरम्यान, आज नवभारत टाइम्स या हिंदी संकेतस्थळाने मोदी आणि रजनीकांत यांच्या संभाव्य भेटीचे वृत्त दिले आहे. गेल्या आठवड्यात चाहत्यांशी संवाद साधतांना रजनीकांत यांनी त्यांना मोठ्या लढ्यास तयार राहण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन रजनी यांच्या राजकीयदृष्ट्या सक्रिय होण्याचे संकेत मानले जात आहे. मी पक्का तामिळीच आहे. जर तामिळी लोकांनी स्वीकारले नाही तर मी थेट हिमालयात जाईन, असे रजनीकांत यांनी म्हटले होते.
दक्षिणेतील राजकारणात फिल्मी कलाकारांचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. तेथे अनेक कलाकारांनी सामान्य कलाकार ते अव्वल राजकारणी अशी झेप घेतली आहे. नुकत्याच दिवंगत झालेल्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि ज्येष्ठ नेते करुणानिधी यांनीही राजकारणात उतरण्यापूर्वी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावले होते.