एकाविरुद्ध दहाजणांची एकजूट होत असेल तर शक्तिशाली कोण? रजनीकांत यांनी मान्य केले मोदींचे बळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 03:09 PM2018-11-13T15:09:35+5:302018-11-13T15:21:04+5:30
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली विषयी संकेत मिळू लागले आहे.
चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली विषयी संकेत मिळू लागले आहे. जर दहा पक्ष एका व्यक्तिविरोधात एकजूट होत असतील तर कोण अधिक शक्तिशाली आहे, हे आपोआप समजून येते. असे सांगत सध्याच्या भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदीच अधिक शक्तिशाली असल्याचे रजनीकांत यांनी यांनी इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये मान्य केले आहे.
रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केल्यापासून तामिळनाडूमधील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रजनीकांत यां नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जायचे की महाआघाडीत सामील व्हायचे याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण याबाबतचे संकेत ते देत आहेत. भाजपा हा खरोखरच धोकादायक पक्ष वाटतो का असे विचारले असता रजनीकांत म्हणाले,'' जर दहा पक्ष असा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ते खरे असावे. मात्र सध्यातरी मोदी आणि भाजपाबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचा माझा विचार नाही. पण 10 पक्ष एखाद्या व्यक्तीविरोधात एकत्र येत असतील तर कोण अधिक शक्तिशाली आहे, हे तुम्ही समजू शकता."
रजनीकांत यांनी घेतलेली ही भूमिका भाजपासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी नोटाबंदीबाबत बोलताना रजनीकांत यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.