रजनीकांत, कमल हसन यशस्वी राजकारणी बनतील असे वाटत नाही - मणीशंकर अय्यर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 05:46 PM2018-01-19T17:46:05+5:302018-01-19T17:51:00+5:30
राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील असे वाटत नाही.
नवी दिल्ली - राजकारणात उतरलेले तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन जनमानसाची पकड घेणारे प्रभावी राजकारणी बनतील असे वाटत नाही असे मत काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या मणी शंकर अय्यर यांनी व्यक्त केले. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. रजनीकांत यांच्या राजकारणात उतरण्याचे सर्वांनीच स्वागत केले आहे.
रजनीकांत एक चांगला माणूस आहे अशा चांगल्या माणसांची आज राजकारणात आवश्यकता आहे. पण चांगली माणस देशाची पंतप्रधान होतील अशी अपेक्षा करण म्हणजे मणीशंकर अय्यरने देशाच्या पंतप्रधानपदाच स्वप्न पाहण्यासारख आहे. असं घडू शकत नाही असे अय्यर म्हणाले. एमजीआर आणि जयललिता द्रविडीयन चळवळीशी संबंधित होते. त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्राच्या प्रभावाचा राजकारणात पुरेपूर वापर केला त्यामुळे ते राजकारणात यशस्वी ठरले असे अय्यर म्हणाले.
दक्षिणेतील यशस्वी अभिनेते शिवाजी गणेशन, कॅप्टन विजयकांथ राजकारणात कसे अपयशी ठरले त्याची त्यांनी उदहारणे दिली. सिनेमामध्ये त्यांची कारकीर्द यशस्वी होती पण तेच यश त्यांना राजकारणात लाभले नाही. रजनीकांत तामिळनाडूमध्ये काँग्रेसला हरवतील पण अन्य पक्षांना पराभूत करणे त्यांना जमणार नाही असे मणीशंकर अय्यर म्हणाले.
गुजरात निवडणुकीच्यावेळी मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नीच माणूस म्हटले होते. मोदी नीच आणि असभ्य माणूस आहे अशी विधाने त्यांनी केली होती. गुजरात निवडणुकीत त्यांच्या या विधानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं.