रजनीकांत जुलै महिन्यात करु शकतात राजकीय पक्षाची घोषणा
By admin | Published: May 27, 2017 01:44 PM2017-05-27T13:44:13+5:302017-05-27T13:45:06+5:30
अलीकडेच रजनीकांत यांनी सलग चार दिवस आपल्या चाहत्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राजकीय प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 27 - दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत जुलै अखेरीस राजकीय प्रवेशाची घोषणा करु शकतात अशी माहिती रजनीकांत यांचे बंधु सत्यनारायण राव गायकवाड यांनी दिली. सत्यनारायण राव बंगळुरुमध्ये राहतात. रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी लोकांची इच्छा आहे. चाहते आणि हितचिंतकांशी चर्चेची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केली आहे असे सत्यनारायण यांनी सांगितले.
अलीकडेच रजनीकांत यांनी सलग चार दिवस आपल्या चाहत्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राजकीय प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यापार्श्वभूमीवर सत्यनारायण यांचे विधान महत्वाचे आहे. चारदिवसाच्या चाहत्यांबरोबरच्या भेटीत रजनीकांत यांनी अनेक राजकीय विधाने केली. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. काही संघटनांनी रजनीकांत यांच्या कन्नड असण्यावर आक्षेप घेत त्यांच्या राजकीय प्रवेशाला विरोध केला.
पोझ गार्डन येथील रजनीकांत यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. या आंदोलनानंतर दुस-याचदिवशी रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी चेन्नईमध्ये मोर्चा निघाला होता. सध्याच्या परिस्थितीत राज्यव्यवस्था लोकांचा विचार करत नाहीय. हे चित्र बदलले पाहिजे. तुमच्यासारख्याच माझ्यावर जबाबदा-या आणि काम आहे. आपण आपले काम करत राहू पण जेव्हा वेळ येईल तेव्हा युद्धासाठी तयार रहा असे रजनी आपल्या समर्थकांना म्हणाले होते.
या दौ-यात त्यांनी नाव न घेता द्रमुकवरही टीका केली होती. 21 वर्षांपूर्वी एका पक्षाला पाठिंबा देऊन आपण चूक केली असे रजनी म्हणाले होते. 15 मे ते 19 मे या चारदिवसात रजनीकांत यांनी तामिळनाडूतील 15 जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांची भेट घेतली होती. राजकीय प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्याआधी जून आणि जुलैमध्ये चर्चेच्या आणखी काही फे-या होतील असे सत्यनारायण राव यांनी सांगितले.
रजनीकांत यांना जास्तीत जास्त चाहत्यांना भेटण्याची इच्छा आहे. आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला असून, चांगल्या सकारात्मक निर्णयाने तामिळनाडूत राजकारणाचे नवे युग सुरु होईल असे सत्यनारायण यांनी सांगितले.
मागच्या चार दशकातील तामिळनाडूचा इतिहास बघितला तर, लोकप्रिय व्यक्तींनीच इथले सत्ता सिंहासन संभाळले आहे. दिवगंत मुख्यमंत्री जयललिता यांचे अकाली निधन आणि वृद्धापकाळाने राजकारणात सक्रीय नसलेले करुणानिधी यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याची क्षमता रजनीकांत यांच्यामध्ये आहे. त्यामुळे रजनी यांचे असंख्य चाहते त्यांच्या राजकीय प्रवेशाची वाट पाहत आहेत.