इंटरनेटवर गाजतोय 'मर्सल' सिनेमातील 'GST'चा सीन, थलायवा रजनीकांतनंही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 10:10 AM2017-10-23T10:10:41+5:302017-10-23T10:35:44+5:30
'मर्सल' या तमिळ सिनेमावरुन सुरू असलेला वाद एकीकडे संपण्याचा नाव घेत नाहीय, तर दुसरीकडे या सिनेमाचं केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर दिग्गजांकडूनही प्रचंड कौतुक केले जात आहे.
नवी दिल्ली - 'मर्सल' या तमिळ सिनेमावरुन सुरू असलेला वाद एकीकडे संपण्याचा नाव घेत नाहीय, तर दुसरीकडे या सिनेमाचं केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर दिग्गजांकडूनही प्रचंड कौतुक केले जात आहे. नुकतेच थलायवा रजनीकांत यांनीही 'मर्सल' सिनेमाचं कौतुक करणारे ट्विट केले आहे. 'मर्सल सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा मांडण्यात आला आहे. यासाठी मर्सल सिनेमाच्या टीमचं अभिनंदन', असे ट्विट करत रजनीकांत यांनी मर्सल सिनेमाचं कौतुक केले आहे.
Important topic addressed... Well done !!! Congratulations team #Mersal
— Rajinikanth (@superstarrajini) October 22, 2017
मात्र, नेमक्या कोणत्या मुद्यावर सिनेमाचं कौतुक करण्यात आलंय, हे रजनीकांत यांनी ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले नाही. दरम्यान, या सिनेमात जीएसटीचा उल्लेख करण्यात आला आहे. या दृश्यावर भाजपानं आक्षेप नोंदवला आहे. अभिनेता विजयचा सिनेमा मर्सलमध्ये जीएसटी आणि डिजिटल इंडिया योजनांवर टीका करण्यात आली आहे. यामुळे भाजपानं या सिनेमाला विरोध दर्शवत सिनेमातील जीएसटीसंदर्भातील संवाद हटवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, 'मर्सल' या तामिळ सिनेमावरुन सुरु झालेल्या वादात उडी घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले होते. मर्सल सिनेमातून जीएसटी कररचना आणि डिजिटल इंडिया या मोदी सरकारच्या दोन महत्त्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने या दृश्यांवर आक्षेप घेत ती सिनेमातून हटवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी टि्वट करुन या सिनेमाला समर्थन दिले आहे.
'मोदी मर्सल सिनेमा तमिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तुम्ही तामिळ अभिमानावर बंदी आणू नका' असे टि्वट राहुल यांनी केले आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या मर्सल सिनेमात जीएसटीचा उल्लेख आहे. भाजपाला सिनेमातील हे दृश्य अजिबात आवडले नसून, त्यांनी आक्षेप घेत सीन कट करण्याची मागणी केली आहे.
Mr. Modi, Cinema is a deep expression of Tamil culture and language. Don't try to demon-etise Tamil pride by interfering in Mersal
— Office of RG (@OfficeOfRG) October 21, 2017
'चुकीची विधानं करू नयेत'
मी हा सिनेमा पाहिला नाही. पण ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला त्यांना जीएसटी आणि डिजिटल पेमेंटबद्दलच्या चुकीच्या माहितीमुळे अपमानित झाल्यासारखे वाटते. जीएसटीचा धोरणात्मक निर्णय होता. केंद्र सरकारने भरपूर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला. सेलिब्रिटींनी अशी चुकीची विधाने करु नयेत, असे तामिलीसाई सौदराजन म्हणाल्या. त्या तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.