रजनीकांत म्हणतो राजकारण प्रवेश परमेश्वरी इच्छेनुसार
By admin | Published: May 16, 2017 01:38 AM2017-05-16T01:38:15+5:302017-05-16T01:38:15+5:30
स्वत:च्या आर्थिक ऊर्जितावस्थेसाठी आपण राजकारणात यावे असा आग्रह धरणाऱ्या चाहत्यांची सुपरस्टार रजनीकांत
चेन्नई : स्वत:च्या आर्थिक ऊर्जितावस्थेसाठी आपण राजकारणात यावे असा आग्रह धरणाऱ्या चाहत्यांची सुपरस्टार रजनीकांत याने सोमवारी पुन्हा एकदा निराशा केली पण त्याचबरोबर आपल्या राजकारण प्रवेशाचा विषयही गुलदस्त्यात ठेवला.
आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर रजनीकांत यांनी राघवेंद्र मठ येथे चाहत्यांची भेट घेतली आणि त्यानिमित्त प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधला. पुढील तीन दिवस ते या ठिकाणी चाहत्यांना भेटणार आहेत व आपल्यासोबत स्लेफी काढण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत.
राजकारण प्रवेशाविषयी विचारता रजनीकांत यांनी चाहत्यांच्या दृष्टीने आणि स्वत:पुरते अशी दोन उत्तरे दिली. ते म्हणाले की. मी राजकारणात पडणार नाही, असे मी आत्ता सांगून टाकले तर ज्यांचे स्वत:चे आर्थिक भले करून घेण्याचे मनसुबे आहेत असा माझ्या चाहत्यांचा एक वर्ग नाराज होईल. मी राजकारणात उतरलोच तर अशा चाहत्यांना मी माझ्याजवळ फिरकूही देणार नाही. त्यामुळे त्यांनी अशी आशा सोडून द्यावी, असे मी त्यांना सांगेन.
सुपरस्टार रजनीकांत असेही म्हणाला की, इतरांची उदाहरणे देऊन चाहते मला पत्र पाठवून विचारतात की त्यांच्याप्रमाणे तुम्ही कधी पुढे जाणार, प्रगती करणार? मागून आलेले अनेक जण पुढे गेले व कोणी नगरसेवक तर कोणी मंत्री झाले, असे ते कळवितात. काही चाहत्यांनाही अशी पदे मिळावीत असे वाटते. त्यांच्यादृष्टीने अशी इच्छा बाळगणे बरोबरही असेल, मी त्यांना चूक म्हणणार नाही. पण असे पैशासाठी राजकारणात पडून इच्छिणाऱ्यांना रागवावे की हसावे, हे मला कळत नाही. रजनीकांत म्हणाले की, यापूर्वी अनेकदा सांगितले तेच मी पुन्हा सांगेन. मी परमेश्वराच्या हातचे बाहुले आहे. तो सध्या माझ्याकडून अभिमय करून घेत आहे म्हणून मी अभिनेता आहे. उद्या परमेश्वरी इच्छेने जी काही भूमिका बजावावी लागेल ती मी मनापासून पार पाडेन. (वृत्तसंस्था)