मोदी सरकारविरोधातील वडिलांच्या 'त्या' वक्तव्याला राजीव बजाज म्हणाले, 'साहसी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 03:03 PM2019-12-02T15:03:03+5:302019-12-02T16:27:01+5:30
बजाज यांच्या टीकेला अमित शाह यांनी कार्यक्रमातच उत्तर दिले होते. देशात कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. परंतु, तुम्ही म्हणत असाल की, देशात अशा प्रकारचे वातावरण आहे, तर ते ठिक करण्यात येईल, असंही शाह म्हणाले होते.
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे त्यांचे पुत्र आणि बजाज अॅटोचे एमडी राजीव बजाज यांनी समर्थन केले आहे. तसेच आपल्या वडिलांनी दाखवलेली हिंमत असामान्य आणि साहसी असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजीव बजाज म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील कोणीही आपल्या पित्याच्या पाठिशी उभे राहू इच्छित नसून मिळत असलेल्या सुविधेसह एका बाजुला बसून टाळ्या वाजवण्यात धन्यता मानत आहेत. वडिल खरं बोलण्यासाठी कधीही संकोच ठेवत नाहीत, असंही ते म्हणाले.
गेल्या शनिवारी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी म्हटले होते की, युपीए सरकार सत्तेत होतं त्यावेळी आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. मात्र आता आम्ही भाजप सरकारवर टीका केल्यास, तुम्हाला आवडणार नाही याची मला खात्री असल्याचे गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि पियुष गोयल यांना उद्देशून बजाज म्हणाले होते.
राहुल बजाज म्हणाले होते की, देशातील उद्योगपतींमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसकडून बजाज यांना समर्थन देण्यात आले आहे. तर निर्मला सितारमण यांना बजाज यांचे वक्तव्य राष्ट्रदोही आहे. अशा वक्तव्यामुळे राष्ट्रहिताला धक्का बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान बजाज यांच्या टीकेला अमित शाह यांनी कार्यक्रमातच उत्तर दिले होते. देशात कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. परंतु, तुम्ही म्हणत असाल की, देशात अशा प्रकारचे वातावरण आहे, तर ते ठिक करण्यात येईल, असंही शाह म्हणाले होते.