राजीव गांधी यांना देशभरात आदरांजली; सद्भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:15 AM2019-08-21T04:15:57+5:302019-08-21T04:16:18+5:30
राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीचा दिवस काँग्रेसने सद्भावना दिन म्हणून पाळला.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त त्यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी या दिग्गजांसह काँग्रेसमधील ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली.
दिल्लीतील वीरभूमी येथील स्मारकस्थळी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्ष सरचिटणीस प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, भूपिंदरसिंह हुडा आदींचा समावेश होता. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीही यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रार्थनासभाही आयोजिण्यात आली होती. राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीचा दिवस काँग्रेसने सद्भावना दिन म्हणून पाळला. त्यानिमित्त मंगळवारी काही कार्यक्रम पार पडले. तसेच या आठवडाअखेरपर्यंत काँग्रेसतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, माझे वडील राजीव गांधी देशभक्त होते. त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देश घडविण्यास मोलाचा हातभार लागला. कधीही कोणाचाही द्वेष करू नका, प्रत्येकाबद्दल प्रेम व आदरभाव बाळगा हीच शिकवण त्यांनी मला दिली.
प्रियांका गांधी यांनी सांगितले की, लोकांच्या मनातले जाणून घ्या ही शिकवण मी माझे वडील राजीव गांधी यांच्याकडून घेतली. आपल्याला न पटणारे विचारही शांतपणे ऐकून घ्यावे असे त्यांचे सांगणे होते. अहमद पटेल म्हणाले की, प्रागतिक धोरणे, सहिष्णूता यांना पाठबळ देण्याचे राजीव गांधी यांचे धोरण होते.
काँग्रेस पक्षाने सद्भावना दिनानिमित्त म्हटले आहे की, जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांना या देशाचे तुकडे पाडण्यापासून रोखणे हीच राजीव गांधी यांना खरी आदरांजली ठरेल. भारताला २१व्या शतकातील सामर्थ्यशाली देश बनविणे हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळेच त्यांनी तंत्रज्ञान, शिक्षण याच्यावर भर देत समाजातील दुर्बलांचे सबलीकरण करण्याचे प्रयत्न केले.
पंतप्रधान मोदींनी केले वंदन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राजीव गांधी यांच्या स्मृतींना वंदन करतो असे मोदी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे.