राजीव सरकार उलथवण्याचा होता लष्कराचा कट!
By Admin | Published: October 5, 2015 03:52 AM2015-10-05T03:52:17+5:302015-10-05T03:52:17+5:30
राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता
चंदीगड : राजीव गांधी यांचे सरकार १९८७मध्ये उलथून टाकण्याचा कट भारतीय लष्कराच्या मदतीने रचण्यात आला होता. त्यासाठी तीन क्रॅक पॅरा-कमांडो बटालियन्सला(त्यात पश्चिम कमांडचाही सहभाग होता) दिल्लीत कारवाईसाठी आगेकूच करण्याचा आदेश देण्यात आला होता, असा खळबळजनक दावा लष्कराच्या पश्चिम कमांडचे माजी कमांडर लेप्ट. जन. पी.एन. हून यांनी केला आहे.
तत्कालीन लष्करप्रमुख कृष्णस्वामी सुंदरजी व उपलष्करप्रमुख लेप्ट. जन. एस.एफ. रॉड्रिग्ज यांचाही या कटात सहभाग होता, असेही ८६वर्षीय हून यांनी नुकत्याच प्रकाशित ‘द अनटोल्ड ट्रुथ’ या पुस्तकात नमूद केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राजीव गांधी यांच्याशी सख्य नसलेल्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी हा कट रचताना लष्कराला हाताशी धरले होते. १९८७मध्ये पंजाबचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर रे यांनी चंदीगडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्यानी झैलसिंग यांनी राजीव गांधींवर भ्रष्टाचाराचा तसेच त्यांना १९८४च्या शीख दंगलीतील पीडितांची चिंता नसल्याचा आरोप केला होता.
हून हे वेस्टर्न कमांडचे प्रमुख असताना मे-जून १९८७मध्ये कार्यालयीन कामासाठी दिल्लीत गेले असता त्यांना बटालियन मूव्ह करण्याबाबत संदेश मिळाला होता. लष्कराच्या मुख्यालयाला तीन पॅरा-कमांडो बटालियन हलविण्याबाबत पत्र पाठविण्यात आल्याची माहिती त्यात होती. पश्चिम कमांडच्या अंतर्गत असलेली पहिली तसेच उत्तर आणि दक्षिण कमांडच्या नवव्या आणि दहाव्या बटालियनला दिल्लीत कूच करण्याचा तो आदेश होता. विशेष दलांची मागणी करण्यात आल्याबाबत मी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे प्रधान सचिव गोपी अरोरा यांना घडामोडींची माहिती दिली. या बटालियन रॉड्रिग्ज यांच्या नियंत्रणाखाली ठेवल्या जाणार होत्या. देशासाठीच नव्हे तर राजकीय यंत्रणेला हादरा देणारा असा हा आदेश असल्याची कल्पना मला होती. मी त्यावेळी दिल्ली एरिया कमांडरला माझ्या आदेशाखेरीज सैन्य हलवू नका, असा आदेश देत ही मोहीम यशस्वी होऊ दिली नाही, असा दावाही हून यांनी या पुस्तकात केला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
———————————————-
लष्करी राजवटीची भीती
हून हे आॅक्टोबर १९८७ मध्ये निवृत्त झाले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री विद्याचरण शुक्ला यांंना लष्कराच्या हालचालींची माहिती होती, असे हून यांनी त्यांच्या पुस्तकात ‘ ग्यानी झैलसिंग विरुद्ध राजीव गांधी’ या दहाव्या प्रकरणात म्हटले आहे. त्यावेळी शुक्ला हे चांदमिनार येथे खास माझी भेट घेण्यासाठी आले होते. राजीव गांधी यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यास लष्कराच्या हाती सत्ता सोपविली जाण्याची भीती तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना होती, असेही हून यांनी म्हटले. अनेक युद्धांत सहभागाचा अनुभव असलेले ९४ वर्षीय एअर मार्शल रणधीरसिंग यांनी मात्र हून यांच्या दाव्याला छेद दिला आहे. लष्करी उठावाचा कोणताही प्रयत्न कधीही झाला नाही. भारतीय जवानांना दिले जात असलेले पारंपरिक प्रशिक्षण त्या स्वरूपाचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.