राजीव प्रताप रूडी यांच्यासह सहा मंत्र्यांचा राजीनामा, केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 10:53 PM2017-08-31T22:53:57+5:302017-08-31T23:16:04+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते.
नवी दिल्ली, दि.31 -केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेनंतर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समजते.
केंद्रीय कौशल्य विकास मंत्री आणि भाजपाचे बिहारचे नेते राजीव प्रताप रूडी, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती तसेच आरोग्य राज्यमंत्री फागनसिंह कुलस्ते यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच संजीव बलियान, कलराज मिश्रा, महेंद्र पंड्या या मंत्र्यांनीही राजीनामा दिल्याचे कळते.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौ-यावर जाणार आहेत. तर राष्ट्रपती तिरूपती येथून शनिवारी दिल्लीला परतणार आहेत. त्यामुळे शनिवारी सायंकाळी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मात्र, अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौ-यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.