राजीव प्रताप रुडी पुन्हा वैमानिकाच्या भूमिकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:40 AM2019-06-03T01:40:10+5:302019-06-03T01:40:29+5:30
प्रवासी चकित; २००८ साली घेतला कमर्शिअल पायलटचा परवाना
एस.पी.सिन्हा
पाटणा : भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी शनिवारी (१ जून) स्वत: विमान चालवित दिल्लीहून पाटण्यात आले. एखाद्या व्यावसायिक वैमानिकाप्रमाणे ते ‘इंडिगो’चे विमान चालवित आले. रुडी यांना ‘कॉकपिट’मधून उतरताना पाहून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.
रुडी यांनी २००८ साली कमर्शिअल पायलटचा परवाना घेतला आहे. त्यांच्याकडे एअरबस ३२० उडविण्याची खुबी आहे. रुडी हे इंडिगो कंपनीत मानद सह वैमानिक म्हणून काम करतात, असे सांगितले जाते. केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार असताना रुडी यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री म्हणून काम पाहिले होते. तेव्हाही ते विमान चालवित असत. राजीव प्रताप रुडी वैमानिक म्हणून काम करत असत. त्यांना विमान चालविण्याची संधी मिळते, तेव्हा ते सदैव तयार असतात.
पाटणा येथे आल्यानंतर राजीव प्रताप रुडी म्हणाले की, जनतेने जो जनादेश दिला आहे, तो निश्चितपणे विकासासाठी दिला आहे. आमचे सरकार बनले आहे. आम्ही वेगाने विकास करु. जनता दलाच्या (यू)सरकार मध्ये सहभागी न होण्याच्या विषयावर रुडी म्हणाले की, हे प्रकरण उच्चस्तरीय आहे. त्यावर चर्चा झाली आहे. काहीही नाराजी नाही. याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरजही नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचा पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळापासून बाजूला राहून बिहारमध्ये विकासाची कामे पुढे नेत राहील, असे सांगितले आहे.
दोघांत कुरबुरी नाहीत
नितीशकुमार यांनी कोणतेही विपरित विधान केलेले नाही,असे सांगून रुडी म्हणाले की, बिहार मध्ये एनडीए एकत्रित सरकार चालवित आहे. जद(यू) हा एनडीएचा मुख्य भाग आहे, आणि राहील. भाजप व जनता दल (यू) यांच्यात काहीही समस्या वा कुरबुरी नाहीत. जनता दलास मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने विरोधक नेते उलटसुलट वक्तव्ये करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत आहेत, मात्र त्यामुळे काही फरक पडत नाही.