राजीव यांचे नाव हटविले
By admin | Published: April 21, 2016 03:34 AM2016-04-21T03:34:49+5:302016-04-21T03:34:49+5:30
‘राजीव गांधी खेल अभियान’मधील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटविण्यात आले असून आता त्याऐवजी ‘खेलो इंडिया’ असे नामकरण करण्यात आल्याची माहिती
नवी दिल्ली : ‘राजीव गांधी खेल अभियान’मधील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटविण्यात आले असून आता त्याऐवजी ‘खेलो इंडिया’ असे नामकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बुधवारी दिली.
गुजरातच्या ‘खेल महाकुंभ’मध्ये देशातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी २७ क्रीडा प्रकारात सहभागी होतात. गुजरातचे क्रीडा प्राधिकरण दरवर्षी ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित करीत असते. त्याच मॉडेलवर ‘खेलो इंडिया’ आधारित राहील, असे सोनोवाल म्हणाले. संपुआ सरकारने ही योजना सुरू केली होती. रालोआ सरकारने त्यातील राजीव गांधी यांचे नाव हटविण्याच्या हेतूने नवे नामकरण केल्याचे सांगत काँग्रेसने सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. देशात स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याचा त्यामागे उद्देश असून राजकारणाशी देणे-घेणे नसल्याचे सोनोवाल यांनी म्हटले. संपुआ सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानाऐवजी राजीव गांधी खेळ योजना सुरू केली होती. या योजनेनुसार ५ वर्षांत ६३४ जिल्ह्णांमध्ये ६५४५ गटांमध्ये क्रीडा संकुल तयार करण्यात येणार होते.
अन्य दोन योजनांचे विलिनीकरण
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि तत्कालीन क्रीडामंत्री जितेंद्रसिंग यांनी ही योजना सुरू केली होती, मात्र या फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. आता नावही बदलले गेले. यापूर्वीच्या सरकारने सुरू केलेल्या नागरी खेळ पायाभूत संरचना योजना, राष्ट्रीय खेळ प्रतिभा शोध या अन्य दोन योजनाही खेलो इंडियामध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)