वर्ष पूर्ण होण्याआधीच कोसळले राजकोट विमानतळाचे छत; धक्कादायक व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 02:49 PM2024-06-29T14:49:19+5:302024-06-29T14:58:55+5:30

गुजरातमधील राजकोट विमानतळाच्या बाहेरील छताचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळला.

Rajkot Airport Canopy Collapsed Heavy Rain Caused Accident | वर्ष पूर्ण होण्याआधीच कोसळले राजकोट विमानतळाचे छत; धक्कादायक व्हिडीओ समोर

वर्ष पूर्ण होण्याआधीच कोसळले राजकोट विमानतळाचे छत; धक्कादायक व्हिडीओ समोर

Rajkot Airport : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ नंतर गुजरातमधील राजकोट विमानतळाचे छत शनिवारी कोसळले.  राजकोटच्या हिरासरमध्ये बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा मोठा भाग पावसात कोसळला. राजकोट विमानतळ घटनेत सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. दुसरीकडे दिल्लीत विमानतळाचे छत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे दिल्लीच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येक मुद्द्यावर राजकारण आणणे चुकीचे असल्याचे म्हटलं आहे.

शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पावसामुळे छताचा काही भाग कोसळून एका कॅब चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी गुजरातमधील राजकोट विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळून खाली कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छताचा भाग कोसळला. राजकोट विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन जुलै २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते. १४० कोटींहून अधिक खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी तेथे कोणीही उपस्थित नव्हते.

तीन दिवसातील तिसरी घटना

शुक्रवारीच दिल्ली विमानतळाचे छत कोसळले होते. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक लोक जखमी झाले होते. शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे देशांतर्गत उड्डाणांसाठी पार्किंग परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान अचानक विमानतळाच्या टर्मिनल-१ मधील छताचा मोठा भाग खाली पडला. त्यात कारमध्ये बसलेल्या चालकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले.

दुसऱ्या घटनेत मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये गुरुवारी नव्याने बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळाच्या ड्रॉप अँड गो एरियामध्ये छत फुटल्याने पाण्याचा पूर आला होता. या पुरात एक कार चक्काचूर झाली.

Web Title: Rajkot Airport Canopy Collapsed Heavy Rain Caused Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.