राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:09 PM2024-05-28T22:09:05+5:302024-05-28T22:10:14+5:30
राजकोट येथे झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये 9 मुलांसह 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Rajkot Game Zone Fire : गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये 25 मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये 9 मुलांसह 28 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आग इतकी भीषण होती की, अनेकांचा जळून कोळसा झाला, त्यांची ओळखही पटवणे अवघड झाले होते. DNA चाचणीच्या मदतीने अनेकांची ओळख पटवण्यात आले. विशेष म्हणजे, या मृतांमध्ये गेम झोनच्या मालकाचाही समावेश आहे.
या आगीत गेम झोनचे मालक प्रकाश हिरण यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अवशेषांचे DNA नमुने आईशी जुळल्यामुळे त्यांची ओळख पटली. आग लागली त्यावेळी प्रकाश हिरण हे देखील सीसीटीव्हीत कैद झाले होते. आगीच्या घटनेनंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नव्हता, सर्व फोन नंबरही बंद होते. यानंतर प्रकाश यांचा भाऊ जितेंद्रने पोलिसांकडे डीएनए चाचणीसाठी निवेदन दिले होते.
उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारले
टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीप्रकरणीगुजरात उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला कठोर शब्दांमध्ये फटकारले. एवढ्या वर्षांपासून विना एनओसी हा प्रकार सुरू होता, अधिकारी झोपले होते का? आमचा स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवर विश्वास नाही. तुम्ही आंधळे झाले होते, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत प्रकरण दाखल करून घेतले होते, त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
कशामुळे लागली आग?
गेमिंग झोनमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात दिसते की, पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच्या खाली फोम शीट, प्लास्टिकचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या शीट व इतर साहित्य ठेवले होते. त्यावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि त्यामुळे आग लागली. कर्मचाऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. अवघ्या दोन-तीन मिनिटांमध्येच आगीने रौद्ररुप धारण केले.