एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:52 PM2024-05-27T13:52:31+5:302024-05-27T13:53:00+5:30
Rajkot Game Zone Fire: गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये २५ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये ९ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता या दुर्घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये २५ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये ९ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता या दुर्घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये एका ठिणगीने भीषण आगीचं रूप घेतलं आणि दोन मिनिटांच्या आत संपूर्ण गेम झोन आगीच्या विळख्यात सापडला, असं दिसत आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच अग्निशमन दलाच्या आठ पथकांनी प्रयत्नांची शर्थ करत सुमारे ३ तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. दुर्घटनेनंतर २५ हून अधिक जणांना घटनास्थळावरून वाचवण्यात यश आलं. मात्र या भीषण अग्नितांडवात २८ हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
राजकोट गेमिंग झोनमधील झालेल्या दुर्घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही कॅमेरा समोर आला आहे. त्यामध्ये एक छोटीशी ठिणगी बघता बघता संपूर्ण गेमिंग झोनला आगीच्या भक्ष्यस्थानी पाडताना दिसत आहे. ही घटना घडली तेव्हा काही वेळ कुणालाच काहीच कळले नाही. सगळे निश्चिंतपणे बाहेर पडताना दिसत होते. मात्र बघता बघता घटनास्थळी गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यसाठी पळापळ सुरू झाली. वेल्डिंग करत असताना निघालेली ठिणगी प्लॅस्टिकच्या ढिगावर पडली आणि बघता बघता भीषण आग लागली. त्यानंरत तिथे असलेल्या लोकांनी आग शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
या अग्निकांडामध्ये २८ जणांचा बळी गेला. त्यात ९ मुलांचाही समावेश होता. आता या अग्नितांडवाच्या घटनेबाबत गुजरात हायकोर्टाने सक्त भूमिका घेत स्वत: दखल घेतली आहे. तसेच मृतदेहांची डीएनए चाचणी लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच ७२ तासांमध्ये एसआयटी आपला अहवाल देणार आहे. तसेच या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र भूपेंद्र पटेल यांनी दिलं आहे. तसेच राजकोट अग्निकांड प्रकरणी गुजरात सरकारने कारवाई करताना सहाय्यक नगर नियोजक, सहाय्यक इंजिनियर, आरएनबी विभागाचे इंजिनियर यांना निलंबित केले आहे.