राजनाथसिंह मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर

By admin | Published: March 16, 2017 03:46 AM2017-03-16T03:46:26+5:302017-03-16T03:46:26+5:30

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता फेटाळल्यामुळे ही धुरा दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना सोपविली जाण्याच्या

Rajnath Singh comes out of the Chief Minister's race | राजनाथसिंह मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर

राजनाथसिंह मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता फेटाळल्यामुळे ही धुरा दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना सोपविली जाण्याच्या अनुमानाला बळकटी मिळाली आहे. पक्षश्रेष्ठींनी जर या पदासाठी विद्यमान आमदारांपैकी एखाद्याला निवडण्याचे ठरविले तर सात वेळा विधानसभेवर निवडून गेलेले सतीश महाना हे प्रमुख दावेदार ठरतात. योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि स्वतंत्र देव सिंग आदी नावेही चर्चेत आहेत. तथापि, सिन्हा आणि महाना हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. या दोघांकडेही उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनण्याचे सर्व कौशल्य असून, दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. सिन्हा पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाची काळजी वाहत असून, त्यांना महत्त्वपूर्ण दूरसंचार मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर यांच्याप्रमाणे महाना हे मोदींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जुने सोबती आहेत. खट्टर पहिल्यांदा निवडून आले असूनही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, महाना हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ आमदार असून, ते आतापर्यंत एकदाही निवडणूक हरलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदावरील दावा अधिक भक्कम आहे. दोन दिवसांपूर्वी मोदी यांनी विशेष विमानाने महाना यांना दिल्लीला बोलविल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
राजनाथसिंह यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यात येणार असल्याचे अंदाज अनावश्यक आणि निष्फळ असल्याचे सांगून याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. राजनाथसिंह यांनी एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद सांभाळले असून, दोनदा प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. सिंह यांचा अनुभव पाहता ते एकटेच पक्षाला राज्यात एकसंघ ठेवू शकतात, असे त्यांचे समर्थक म्हणतात; परंतु विरोधकांचे म्हणणे काही वेगळेच आहे. सिंह यांनी प्रचार मोहिमेची धुरा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळेच मौर्य यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. त्यामुळेच सिंह यांना हक्क पोहोचत नाही, असे त्यांच्या विरोधकांचे मत आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये निवडून आलेल्या आमदारांमधूनच मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येणार असून, तेथे दिल्लीतून कोणाला पाठवायचे नाही, असा निर्णय झाला आहे. आता या पदासाठी देवेंद्रसिंह रावत आणि प्रकाश पंत यांच्यात रस्सीखेच सुरू असून, रावत यांचे पारडे जड असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Rajnath Singh comes out of the Chief Minister's race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.