पाकिस्तानला पुन्हा 'ठीक-ठाक' केलंय; राजनाथांचे 'स्ट्राइक'चे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 10:16 AM2018-09-29T10:16:45+5:302018-09-29T10:38:06+5:30
पाकिस्ताननं आपल्या जवानासोबत केलेलं क्रौर्य आपल्याला ठाऊक आहेच. पण दोन-तीन दिवसांपूर्वी काहीतरी ठीक-ठाक झालंय - राजनाथ सिंह
नवी दिल्लीः भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'ला दोन वर्षं पूर्ण होत असताना, या 'स्ट्राइक'सारखीच काहीतरी धडाकेबाज कामगिरी करून कुरापतखोर पाकिस्तानला 'ठीक-ठाक' केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत. पाकिस्तानी सैन्याने बीएसएफचे शहीद जवान नरेंद्र नाथ यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार सांबा सेक्टरमध्ये घडला होता. त्यानंतर, दोन-तीन दिवसांपूर्वीच भारतीय जवानांनी या कुकर्माचा बदला घेतल्याचं सूचक विधान राजनाथ यांनी केलं.
पाकिस्ताननं आपल्या जवानासोबत केलेलं क्रौर्य आपल्याला ठाऊक आहेच. पण दोन-तीन दिवसांपूर्वी काहीतरी ठीक-ठाक झालंय. मी आत्ता सांगणार नाही, पण अजूनही बरंच काही होणार आहे, असं सूचक विधान राजनाथ सिंह यांनी भगत सिंह यांच्या जयंतीदिनी एका कार्यक्रमात केलं. पाकिस्तान आपला शेजारी आहे, पहिली गोळी तुम्ही चालवू नका, पण तिथून गोळी आल्यास आपल्या गोळ्या मोजू नका, अशा सूचना जवानांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफ जवान नरेंद्र नाथ हे १८ सप्टेंबरला शहीद झाले होते. पाकिस्तानी सैन्यानं त्यांचा मृतदेह खेचत आपल्या हद्दीत नेला होता. या मृतदेहावर तीन गोळ्या झाडल्या गेल्या होत्याच, पण त्याची विटंबनाही झाल्याचं निदर्शनास आलं होतं. पाक सैन्याच्या या हीन कृत्यानं सगळेच खवळले होते आणि त्याचा बदला घेण्याची मागणी होत होती. आता, राजनाथ यांच्या म्हणण्यानुसार भारतीय लष्करानं पाकिस्तानी सैन्याला हिसका दाखवला आहे. त्यांनी नेमकं काय केलं, हे लवकरच कळेल.
दरम्यान, भारत-चीन सीमेवर दोन्हीकडच्या जवानांची केवळ धक्काबुक्की होते, तेही शस्त्रं काढत नाहीत आणि आपणही, अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी दिली. एकेकाळी भारताविरुद्ध युद्ध पुकारणारं चीन आज केवळ धक्काबुक्की करून परत जातंय, हे भारताच्या वाढलेल्या सामर्थ्यांचंच द्योतक आहे, असंही त्यांनी नमूद केलं.