अखेर राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार; दोन दिवसांपूर्वी भेट नाकारलेली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:06 PM2020-09-04T21:06:07+5:302020-09-04T21:06:35+5:30
चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते.
मॉस्को : भारत-चीन (India-China Tension) मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा निर्णय घेतला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) शांघाय सहकार्य परिषदेमध्ये (SCO) ते चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, आज रात्री 9.30 वाजता ते भेटणार आहेत.
पँगाँग झील (India-China Pangong Lake Faceoff) वर झालेल्या ताज्या वादामुळे भारत आणि चीनमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. यावर अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व सैन्याचे ब्रिगेड कमांडर करणार आहेत. मंगळवारीही कमांडरस्तरावरील बैठक झाली होती. चीनच्या सैन्याने 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग झीलच्या दक्षिण बँक क्षेत्रात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने आक्रमक कारवाई करत त्यांना माघारी पाठविले होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एससीओच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. यासाठी ते बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. ही बैठक अशावेळी होत आहे जेव्हा संघटनेचे दोन मोठे देश सीमेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार सप्टेंबरला एससीओतील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये शस्त्रास्त्रे खरेदी आणि सहकार्यावर चर्चा करण्यात आली. तसेच मोठी डीलही करण्यात आली आहे.
दरम्यान, राजनाथ सिंह आज चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत लडाखमधील घुसखोरीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी चीनने रशिया भारताला देत असलेल्या थाड क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीवर आक्षेप घेतला होता.