बिपीन रावत यांना जाऊन 6 महिने झाले, नवीन CDS नियुक्ती कधी होणार? राजनाथ सिंह म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 03:54 PM2022-06-14T15:54:04+5:302022-06-14T15:59:13+5:30
Rajnath Singh On CDS Appointment: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नवीन CDS नियुक्तीबाबत महत्वाची माहिती दिली.
Rajnath Singh On CDS Appointment: देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या या पदावरील नव्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारकडून मोठी माहिती समोर आली आहे. सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेच्या शुभारंभप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'नवीन सीडीएसची नियुक्ती लवकरच केली जाईल, ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे.' काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीडीएसच्या नियुक्तीसंदर्भात नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, लेफ्टनंट जनरल किंवा जनरल किंवा त्याच्या समकक्ष किंवा सेवारत लेफ्टनंट जनरल किंवा जनरल या रँकचा सेवानिवृत्त अधिकारी CDS म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. परंतु नियुक्तीच्या वेळी त्या अधिकाऱ्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सीडीएस पदाची मागणी केव्हा करण्यात आली?
कारगिल युद्धादरम्यान लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयाचा अभाव निदर्शनास आला होता. 1999 मध्ये कारगिल युद्धातील विजयानंतर तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने एक समीक्षा समिती स्थापन केली होती. तिन्ही सेवांमधील समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी समितीने सूचना केल्या होत्या. समितीने तिन्ही सेवांमध्ये समन्वयासाठी एक पद निर्माण करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारने 24 डिसेंबर 2019 रोजी CDS पदाची घोषणा केली आणि जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले CDS बनले. सीडीएसची नियुक्ती वयाच्या 63 वर्षापर्यंत करता येते.
The ‘Agnipath’ scheme approved by the CCS chaired by Prime Minister Shri @narendramodi is a truly transformative reform which will enhance the combat potential of the Armed Forces, with younger profile and technologically adept soldiers. #BharatKeAgniveerpic.twitter.com/2NI2LMiYVV
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 14, 2022
केंद्र सरकारने नियम बदलले
सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दल सेवा कायद्यात बदल केले असून त्याची अधिसूचना आज जारी करण्यात आली. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, सार्वजनिक हितासाठी, लेफ्टनंट जनरल किंवा जनरल किंवा त्याच्या समकक्ष किंवा सेवारत लेफ्टनंट जनरल किंवा जनरल या रँकचा सेवानिवृत्त अधिकारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो. थ्री स्टार जनरल्स म्हणजे लष्करातील लेफ्टनंट जनरल, वायुसेनेतील एअर मार्शल आणि नौदलातील व्हाईस अॅडमिरल वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतात. त्यामुळे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कोणत्याही तीन स्टार जनरलचाही सीडीएस होण्याच्या शर्यतीत विचार केला जाऊ शकतो.
CDS ला कोणते अधिकार आहेत?
CDS हे भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे लष्करी प्रमुख आहेत. हा भारतीय लष्करातील सर्वोच्च दर्जाचा अधिकारी आहे. CDS हे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य लष्करी सल्लागार आहेत. हे अधिकारी पंतप्रधानांचे लष्करी सल्लागारही आहेत. सीडीएस हे लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख देखील आहेत. सीडीएस तीन सेवांमध्ये समन्वय म्हणून काम करतात. समन्वयामुळे, आपत्कालीन परिस्थितीत तिन्ही सैन्यांचा चांगला संपर्क होऊ शकतो. सीडीएस न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणूनही काम करतात.