राजनाथसिंहांनी फटकारले !

By admin | Published: October 24, 2015 04:54 AM2015-10-24T04:54:06+5:302015-10-24T04:54:06+5:30

मोदी सरकारमधील काही मंत्री आणि भाजपा नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणी वाढत आहेत. बेलगाम वक्तव्यांवरून पक्षातील नेत्यांचे भाजपाध्यक्ष अमित शहा

Rajnath Singh rebukes! | राजनाथसिंहांनी फटकारले !

राजनाथसिंहांनी फटकारले !

Next

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील काही मंत्री आणि भाजपा नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणी वाढत आहेत. बेलगाम वक्तव्यांवरून पक्षातील नेत्यांचे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कान उपटल्यानंतर आता पक्षापाठोपाठ केंद्र सरकारनेही तसाच पवित्रा घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी व्ही.के. सिंग आणि किरण रिजिजू या केंद्रीय मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्यांबद्दल जोरदार फटकारले. आमच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला अथवा विपर्यास करण्यात आला असे सांगून जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले.
दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती आयोगाने (एनसीएससी) दलित जळीतप्रकरणी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि गाझियाबादच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावून सिंग यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. तर आम आदमी पार्टीने सिंग यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीने त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
फरिदाबाद जिल्ह्याच्या सोनपेढ गावात एका दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन चिमुकले जळून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेबाबत बोलताना ‘कोणीतरी कुत्र्याला दगड मारला तरी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार का, असा सवाल केल्याने व्ही.के. सिंग अडचणीत आले आहेत. तर गृह राज्यमंत्री रिजिजू यांनीसुद्धा उत्तर भारतातील लोकांना कायद्याचे उल्लंघन करण्यात गर्व वाटतो आणि आनंद मिळतो या दिल्लीतील एका नायब राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली होती.
या पार्श्वभूमीवर फटकार लगावताना राजनाथ म्हणाले, आपल्या बोलण्याचा विपर्यास होऊ नये अथवा त्यातून चुकीचा संदेश जाऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.

एनसीएससीकडून गांभीर्याने दखल
राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे (एनसीएससी) अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी दलित जळीतप्रकरणी व्ही.के. सिंग यांचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका करून पोलिसांना १० दिवसांत यासंदर्भात कारवाई अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आपच्या एका प्रतिनिधी मंडळाने सिंग यांच्या विरोधात आयोगाकडे याचिका केल्यानंतर आयोगाने दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनाही नोटीस बजावून केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.

मोदींनी माफी मागावी - काँग्रेस
व्ही.के. सिंग यांना त्वरित बडतर्फ करण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल क्षमा मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
फरिदाबाद : फरिदाबादच्या सुनपेढ गावात जिवंत जळालेल्या दोन दलित चिमुकल्यांचे वडील जितेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात जितेंद्र हेसुद्धा भाजले असून, संक्रमण वाढत असल्याने त्यांना बी.के. इस्पितळात दाखल करण्यात आले; तर त्यांची पत्नी रेखा यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

कारागृहात पाठवा-मायावती... व्ही.के. सिंग यांना बडतर्फ करून कारागृहात पाठवा आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधानांकडे केली.

Web Title: Rajnath Singh rebukes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.