“भारताची धर्माच्या आधारावर फाळणी करणे, ही ऐतिहासिक चूक होती”: राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 04:44 PM2021-12-13T16:44:44+5:302021-12-13T16:46:03+5:30

पाकिस्तानशी झालेल्या प्रत्यक्ष युद्धात भारताचा विजय झाला होता आणि आताच्या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आपलाच असेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

rajnath singh said that india partition on religious grounds was historic mistake | “भारताची धर्माच्या आधारावर फाळणी करणे, ही ऐतिहासिक चूक होती”: राजनाथ सिंह 

“भारताची धर्माच्या आधारावर फाळणी करणे, ही ऐतिहासिक चूक होती”: राजनाथ सिंह 

Next

नवी दिल्ली: सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणे, ही ऐतिहासिक चूक होती, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केले आहे. सशस्त्र दलांच्या योगदानाचे स्मरण करणार्‍या ‘स्वर्णिम विजय पर्व’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, १९७१ चे युद्ध आपल्याला हेच सांगते की, धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक होती. पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला पण तो एकच राहू शकला नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. 

या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल

पाकिस्तानला दहशतवाद आणि अन्य भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देऊन भारतातील शांतता बिघडवायची आहे. भारतीय सैन्याने १९७१ मध्ये त्यांच्या भारताविरोधातील कारवाया हाणून पाडल्या होत्या आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी काम केले होते. तेव्हापासून अजूनही भारत पाकिस्तानच्या कुरापती रोखण्यासाठी काम करत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. 

पहिले सीडीएस बिपीन रावत यांची खूप आठवण येतेय

अलीकडेच झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह ११ जणांचा मृत्यू झाला होता. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी बिपीन रावत यांची विशेष आठवण काढली. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांची मला खूप आठवण येते आहे. देशाने एक पराक्रमी सैनिक, सक्षम सल्लागार आणि चांगला माणूस गमावला, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, १९७१ च्या युद्धात आमच्या सशस्त्र दलांनी ‘मुक्तिवाहिनी’ला पाठिंबा दिला. लाखो निर्वासितांना मदत केली. तसेच पश्चिम आणि उत्तरेकडील सर्व प्रकारचे आक्रमण रोखले. त्यांनी शांतता, न्याय आणि मानवतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची विश्वासार्हता सुनिश्चित केली. इतिहासात हे क्वचितच पाहायला मिळते की, एखाद्या देशाला युद्धात पराभूत केल्यानंतर दुसरा देश आपले वर्चस्व लादत नाही, तर आपल्या राजकीय प्रतिनिधीकडे सत्ता सोपवतो. भारताने हे केले कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 
 

Web Title: rajnath singh said that india partition on religious grounds was historic mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.