राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखची विभागणी हितकारक: राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 03:16 PM2021-06-28T15:16:41+5:302021-06-28T15:23:29+5:30
कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले.
लडाख: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी भारतीय सैन्याचे अधिकारी आणि जवानांशी मनमोकळा संवाद साधला. भारताची संरक्षण यंत्रणा मजबूत आहे. त्यामुळे कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. (rajnath singh says no one can show india an eye)
लडाख दौऱ्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी काही योजना, प्रकल्पांचे लोकार्पण केले. तसेच जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच लडाखच्या नेत्यांशीही संवाद साधणार आहेत. विविध विषयांवर चर्चा करणार असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. लडाख येथील पायाभूत सुविधांमध्ये मोठे तसेच ठोस बदल करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचेही सिंह यांनी सांगितले. तसेच कारु मिलिस्ट्री स्टेशन येथे जाऊन जवानांना प्रोत्साहन दिले.
“भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल, मी सर्वांना हमी देतो”: अदर पुनावाला
राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी विभागणी हितकारक
तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी एक ट्विट केले असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षिततेला मोठा हातभार लागला आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. तसेच दोन्ही प्रदेशांमधील नागरिकांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकास करण्याच्या अनेक संधी विभागणीनंतर खुल्या झाल्या आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
The Union Government’s decision to bifurcate Jammu & Kashmir and Ladakh as two separate UTs has bolstered national security and led to major reduction in terrorist activities and also opened new avenues for the socio-economic development of the people in both the regions.
— Rajnath Singh (@rajnathsingh) June 28, 2021
दरम्यान, गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरु असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने सुमारे ५० हजार अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केल्याची माहिती मिळाली आहे. चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आता सुमारे २ लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या ४० टक्के अधिक असल्याचे सांगितले जात आहे.