Rajnath Singh : 'सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन दया याचिका दाखल केली होती'-राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:18 AM2021-10-13T09:18:38+5:302021-10-13T16:20:05+5:30
राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी मंगळवारी विनायक दामोदर सावकर(Vinayak Damodar Savarkar) आणि महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्या संबंधावर मोठं वक्तव्यं केलं आहे. 'अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती', असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bahgwat) यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. यावेळी राजनात सिंह म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या विचारसरणीवरुन त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही.'
'सावरकर महानायक होते...'
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, 'एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला गट सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेपासून अपरिचित आहे आणि त्यांना सावरकरांची योग्य समज नाही. काहीजण त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करतात. पण, सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि महाननायक होते, आहेत आणि भविष्यातही असतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्याची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज यावरुन घेता येतो की, ब्रिटिशांनी त्यांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही विशिष्ट विचारसरणीने प्रभावित झालेले लोक अशा राष्ट्रवादी नायकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.'
'सावरकर वास्तववादी आणि राष्ट्रवादी होते'
संरक्षण मंत्री पुढे म्हणतात की, काही विशिष्ट लोक सावरकरांवर नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात. पण, सत्यात ज्यांनी असे आरोप केले, ते स्वतः लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झाले आणि अजूनही आहेत. साध्या शब्दात सांगायचे तर, सावरकर हे 'वास्तववादी' आणि 'राष्ट्रवादी' होते, ज्यांनी बोल्शेविक क्रांतीसह निरोगी लोकशाहीची चर्चा करायचे.'