राजनाथसिंह पाक दौऱ्यावर जाणारच!
By admin | Published: August 2, 2016 04:42 AM2016-08-02T04:42:51+5:302016-08-02T04:42:51+5:30
भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह सार्क मंत्रीस्तरीय परिषदेत सहभागी होेण्यासाठी इस्लामाबादेत आल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील
नवी दिल्ली/लाहोर : भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह सार्क मंत्रीस्तरीय परिषदेत सहभागी होेण्यासाठी इस्लामाबादेत आल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याने दिला आहे. राजनाथसिंह काश्मिरातील निरपराध लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा जावईशोधही त्याने लावला. लष्कर ए तोयबाच्या धमकीला भीक न घालता सरकारने गृहमंत्री राजनाथसिंह नियोजित कार्यक्रमानुसार सार्क मंत्रीस्तरीय परिषदेसाठी पाकिस्तानला जातील, असे सोमवारी स्पष्ट केले.
निष्पाप काश्मिरींच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्याचे स्वागत करून तुम्ही काश्मिरींच्या जखमेवर मीठ चोळणार आहात काय, असे मी पाकिस्तान सरकारला विचारू इच्छितो. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरबाबत निदर्शने करीत असताना पाकच्या राज्यकर्त्यांनी सिंह यांचे पुष्पहारांनी स्वागत करावे, हा विरोधाभास होईल, असे सईद म्हणाला. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पुढे म्हणाला की, राजनाथसिंह तीन आॅगस्ट रोजी इस्लामाबादेत आले, तर जमात उद दावा देशभरात निदर्शने करील, असेही तो म्हणाला.
हाफीज जमात उद दावा या स्वयंसेवी संघटनेचाही प्रमुख आहे. पाकिस्तानी जनता निष्पाप काश्मिरी नागरिकांच्या बाजूने असल्याचा संदेश या निदर्शनातून जाईल, असेही तो म्हणाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)