काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा स्थगित
By admin | Published: July 12, 2016 10:45 AM2016-07-12T10:45:32+5:302016-07-12T10:47:45+5:30
काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरणामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौरा पुढे ढकलला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनी याच्या मृत्यूमुळे काश्मिरमधील हिंसाचार उफाळला असून तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या खो-यात आत्तापर्यंत २३ ठार तर २५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. काश्मीरमधील याच तणावपूर्ण वातावरणामुळे सरकारची काळजी वाढली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौरा पुढे ढकलला आहे. येत्या १७ जुलैपासून राजनाथ सिंह पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर जाणार होते, मात्र काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती पाहता हा विषय सध्या महत्वपूर्ण असल्याचे सांगत सिंह यांनी आपला दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान काशमीरमधील हिंसाचार व तेथील परिस्थितीबद्दल गृहमंत्री येत्या १८ जुलैपासून सुरू होणा-या पावसाळ अधिवेशनात निवेदन करणार आहेत.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनीसह तीन दहशतवादी मारले गेल्याने काश्मीरमध्ये तणावाच वातावरण निर्माण झाले. संचारबंदी व फुटीरवाद्यांनी वनीच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या संपामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अमरनाथ यात्राही स्थगित करण्यात आली आहे. या हिंसाचारामुळे खोऱ्यात २३ जण ठार २५० पेक्षा जास्त जखमी झाले असून खो-यात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद असल्याने शेकडो अमरनाथ यात्रेकरू येथे अडकून पडले. ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’चा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला.