"2 दहशतवादी राहिलेत, त्यांना मारून येतो..."; शहीद सचिनचा वडिलांशी शेवटचा संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:21 AM2023-11-24T10:21:23+5:302023-11-24T10:26:27+5:30
घरी सचिनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. 8 डिसेंबर 2023 रोजी सचिनचं लग्न होणार होतं. घरातील सर्वजण आनंदाने सचिनच्या येण्याची वाट पाहत होते.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना उत्तर प्रदेशचा आणखी एक जवान शहीद झाला आहे. अलिगडचा रहिवासी असलेला सचिन लॉरा सैन्यात कार्यरत होता. काल संध्याकाळी सचिन शहीद झाल्याची बातमी अलिगडमध्ये पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. आठ डिसेंबरला सचिनचं लग्न होणार होतं. मात्र त्यापूर्वीच शहीद झाल्याची बातमी आली.
सचिन टप्पल पोलीस स्टेशन हद्दीतील नगलिया गोरौला गावचा रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव रमेश चंद्र आहे. घरी सचिनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. 8 डिसेंबर 2023 रोजी सचिनचं लग्न होणार होतं. घरातील सर्वजण आनंदाने सचिनच्या येण्याची वाट पाहत होते. पण काल संध्याकाळी सचिन दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाल्याची माहिती मिळाली.
वडील रमेश चंद्र यांनी सांगितलं की, काल सचिनने त्याच्या कुटुंबीयांनाही फोन केला होता. त्यांनी त्याला रजेवर येण्यास सांगितलं होतं. याच दरम्यान सचिन म्हणाला की, अजून दोन दहशतवादी बाकी राहिले आहेत, त्यांना मारून मी परत येईन. त्यानंतर लगेचच फोन बंद झाला. पण सचिनचे हेच शब्द त्याचे शेवटचे शब्द ठरतील हे कोणालाच माहीत नव्हतं.
सचिनला लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची आवड होती. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. सचिनच्या आईला यामुळे मोठा धक्का बसला आहे. आपला मुलगा देशासाठी शहीद झाला, यापेक्षा मोठा सन्मान देशासाठी काय असू शकतो, असं वडिलांनी म्हटलं आहे.
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, सचिन कुटुंबात सर्वात लहान होता. सचिन 2019 मध्ये सैन्यात दाखल झाला. पुढच्या महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. सचिनचा मोठा भाऊ विकास मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. एक मोठी बहीण आहे तिचे लग्न झाले आहे. राजौरीमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक आता संपली आहे. बाजीमल गावाच्या परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. या चकमकीत एकूण 5 जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला.