येथील राजपूतांनी पाहिला 'पद्मावत'; चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, विरोध मागे घेण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 01:22 PM2018-01-25T13:22:46+5:302018-01-25T13:24:06+5:30
'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं पंजाबमधील राजपूत महासभाने म्हटलं आहे
चंदिगड - पंजाबमधील राजपूत महासभाने 'पद्मावत' चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला आहे. बुधवारी राजपूत समाजाशी संबंधित काही लोकांनी पठाणकोटमध्ये स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान 'पद्मावत' चित्रपट पाहिला. जिल्हा प्रशासनाकडून संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. राजपूत महासभा आतापर्यंत या चित्रपटाचा विरोध करत होती, ज्यामुळे चित्रपटात 300 हून अधिक सीन्सवर कात्री चालवण्यात आली. चित्रपट पाहिल्यानंतर राजपूत महासभाचे अध्यक्ष दविन्दर दर्शी यांनी सांगितलं की, 'याआधी आम्ही चित्रपटाचा विरोध करत होतो, ज्यामुळे चित्रपट बनवणा-यांना 300 कट्स करावे लागले'.
'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. 'राजपूत समाजाच्या 30 नेत्यांनी प्रशासनाच्या विनंतीनंतर हा चित्रपट पाहिला असून, आता यामध्ये कोणताच वाद नाही', असंही ते बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मोठ्या संख्येने शिख आणि हिंदू राजपूत पठाणकोट, होशियारपूर आणि गुरुदासपूर जिल्ह्यात वसले आहेत'. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संघटनेच्या शाखा आणि पदाधिकारी दुस-या जिल्ह्यांतही आहेत आणि आता चित्रपटाशी संबंधित कोणताच वाद उरलेला नाही. राजपूत समाजाशी संबंधित काही काँग्रेस नेत्यांनीही हा वाद सोडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
पठाणकोटचे एएसपी विशाल सोनी यांनी सांगितलं आहे की, पद्मावत जिल्ह्यातील चार चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवण्यात येणार आहे. येथे कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची हमीही त्यांनी दिली आहे. विशाल सोनी बोलले आहेत की, 'कोणीही चित्रपटाचा विरोध केलेला नाही, तसंच कोणताही गदारोळ होईल असं वाटत नाही. राजपूत नेत्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर स्तुती केली आहे'.
संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. अनेक ठिकाणी राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. राजस्थान, हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीरसारख्या राज्यांमध्ये चित्रपटगृहांमध्ये तोडफोड करण्यात आली असून गोंधळ घालण्यात आला. गुरुग्रामच्या सोहना रोडवर आंदोलनकर्त्यांनी एक बस जाळून टाकली तसंच दगडफेकही केली. मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेने चित्रपटाची तिकीटविक्री करणा-या कंपनी BookmyShow ला देखील धमकी दिली आहे. 'पद्मावत चित्रपटाची तिकीटविक्री बंद करा अन्यथा विक्री करण्याच्या लायकीचं ठेवणार नाही', अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.