'मुलगा' होण्यासाठी रामदेवबाबांकडील औषधामुळे राज्यसभेत गदारोळ
By admin | Published: April 30, 2015 06:32 PM2015-04-30T18:32:34+5:302015-04-30T18:32:46+5:30
योगगुरू रामदेव बाबा यांच्या दिव्य फार्मसीतून विकण्यात येणा-या 'दिव्य पुत्रजीवक बीज' या औषधाच्या मुद्यावरून राज्यसभेत आज गदारोळ माजला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - योगगुरू रामदेव बाबा यांच्या दिव्य फार्मसीतून विकण्यात येणा-या 'दिव्य पुत्रजीवक बीज' या औषधाच्या मुद्यावरून राज्यसभेत आज गदारोळ माजला. जनता दल युनायटेडचे (जदयु) खासदार के. सी. त्यागी यांनी आज रामदेव बाबांच्या औषधालयातून विकत घेतलेले हे औषध राज्यसभेत आणले. 'हे औषध घेतल्याने मुलगा जन्माला' येत असल्याचा प्रचार या औषधाचे उत्पादन करणा-या दिव्य फार्मसीकडून करण्यात येतो असा आरोप त्यागी यांनी राज्यसभेत केला. तसेच दिव्य फार्मसीची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. जया बच्चन व जावेद अख्तर यांनीही त्यागी यांना साथ दिली. या मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ माजला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ' बेची बचाओ, बेटी पढाओ ' अभियानावर बारकाईने लक्ष ठेवून असताना दुसरीकडे मुलगा जन्माला यावा यासाठीची औषधे विकली जात आहेत, असे सांगत या प्रकरणात सरकारने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी केली. त्यागी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिले.