Rajya Sabha Elecion: उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 11:44 AM2022-06-09T11:44:40+5:302022-06-09T11:44:56+5:30

Rajya Sabha Elecion: महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील राज्यसभेच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यात राजस्थानातील 4, हरयाणातील 2, कर्नाटकातील 4 आणि महाराष्ट्रातील 6 जागा आहेत.

Rajya Sabha Elecion: Voting for 16 seats in four states tomorrow, who will win..? | Rajya Sabha Elecion: उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती

Rajya Sabha Elecion: उद्या चार राज्यातील 16 जागांसाठी मतदान, कोणाचे पारडे जड..? जाणून घ्या माहिती

Next

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीबाबत देशभरात उत्सुकता लागली आहे. मतदान आणि निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीअंतर्गत 15 राज्यांत एकूण 57 जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 41 सदस्य बिनविरोध निवडून आले. अशा स्थितीत आता केवळ 16 जागांवर निवडणूक होणार आहे.

या सर्व 16 जागांसाठी चार राज्यांमध्ये 10 जून रोजी मतदान होत आहे. तसेच, उद्याच सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत हॉर्स ट्रेडिंग आणि क्रॉस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्ष आपापल्या आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात पक्षांतर्गत हेराफेरीचे राजकारणही सुरू आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना रिसॉर्ट किंवा अन्य ठिकाणी एकत्र ठेवले आहे. निवडणुकीच्या दिवशी त्यांना थेट मतदानासाठी नेले जाईल. जाणून घेऊन या चार राज्यांतील समीकरणे काय सांगतात...

महाराष्ट्र-
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे, तर भाजपकडे दोन जागांसाठी पुरेसे आमदार आहेत. राज्यसभेवर उमेदवार पाठवण्याइतपत संख्याबळ शिवसेनेकडेही आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजप आपला तिसरा आणि शिवसेना आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

राजस्थान राज्यसभा निवडणूक-
राजस्थानमध्ये चार जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी काँग्रेसकडून मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा हेही रिंगणात असून, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. काँग्रेसकडे स्वतःचे 108 आमदार आहेत. याशिवाय आरएलडीचे सुभाष गर्ग यांचाही पाठिंबा आहे. 13 अपक्ष, दोन सीपीएम आणि दोन बीटीपी आमदारांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला 126 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसला तिन्ही उमेदवारांसाठी 126 आमदारांच्या मतांची गरज आहे. 

हरियाणा राज्यसभा निवडणूक-
हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कार्तिकेय शर्मा यांना भाजपचा पाठिंबा आहे. तसेच भाजपने कृष्णा पनवार यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून अजय माकन रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजप-जेजेपी युती आपल्या 40 आमदारांच्या जोरावर एक जागा जिंकणार आहे. काँग्रेसचे विधानसभेत 31 आमदार असून ही दुसरी जागा जिंकण्यासाठी पुरेशी मते आहेत. 

कर्नाटक राज्यसभा निवडणूक-
कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी 45 आमदार लागतात. विधानसभेत 70 आमदार असलेल्या काँग्रेसने जयराम रमेश आणि मन्सूर अली खान हे दोन उमेदवार उभे केले आहेत. दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला आणखी 20 मतांची गरज आहे. भाजपचे 121 आमदार आहेत. पक्षाने निर्मला सीतारामन, कन्नड चित्रपट अभिनेते जगेश आणि लहर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपलाही आणखी 14 मतांची गरज आहे. जेडीएसकडे 32 आमदार आहेत. डी कुपेंद्र रेड्डी यांनाही त्यांनी मैदानात उतरवले आहे. रेड्डी यांना आणखी 13 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
 

Web Title: Rajya Sabha Elecion: Voting for 16 seats in four states tomorrow, who will win..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.