एकेका जागेसाठी रस्सीखेच; राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये गणित बिघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:17 AM2022-06-10T06:17:50+5:302022-06-10T06:18:42+5:30
rajya sabha election 2022: राजस्थानमध्ये काँग्रेसकडून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत राजस्थान, कर्नाटक व हरयाणामध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा लागली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा एक-एक सदस्य निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना बरेच प्रयत्न करावे लागत आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसकडून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. परंतु सुभाष चंद्रा यांनी भाजपचे समर्थक म्हणून उमेदवारी दाखल केल्याने पेच निर्माण झाला आहे. तसेच हरयाणामध्ये अजय माकन काँग्रेसचे उमेदवार असले तरी कार्तिकेय शर्मा यांनी उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेससमोर उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे.
काँग्रेस उमेदवाराचे एक मत जरी कमी पडले तरी माकन यांची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. हरयाणात काँग्रेसला ३१ पहिल्या पसंतीची मते हवी आहेत. तेवढीच मते काँग्रेसकडे आहेत. यातील एकाने जरी क्रॉस व्होटिंग किंवा एखादे मत अपात्र ठरल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीच्या रणांगणात जावे लागेल.
कर्नाटकमध्ये चार जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. भाजप व काँग्रेसचा एक-एक सदस्य सहज निवडून येईल; परंतु चौथ्या जागेसाठी काँग्रेस, जेडीएसने उमेदवार दिल्याने राजकीय गणित बिघडले आहे. काँग्रेसने मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिली खरी परंतु त्यांना निवडून येण्यासाठी अतिरिक्त २० मते हवी. जेडीएसचे ३२ आमदार आहेत. त्यांच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचे भवितव्य अधांतरी आहे.
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रात काँग्रेसचे उमेदवार इमरान प्रतापगढी यांना निवडून आणण्यासाठी पुरेसी मते आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी पुरेशी मते असतानाही काँग्रेसचे उमेदवार राम प्रधान यांचा पराभव झाला होता. त्याचप्रमाणे हरयाणातही आर. के. आनंद या काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला होता व सुभाष चंद्रा निवडून आले होते.
या राज्यांत बिनविराेध
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडीशा, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये ४१ उमेदवार बिनविराेध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.