राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने केली उमेदवारांची घोषणा; कोणाला संधी? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:28 PM2024-02-11T20:28:17+5:302024-02-11T20:29:38+5:30
Rajya Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
Rajya Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आरपीएन सिंग आणि सुधांशू त्रिवेदी यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधून आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने सुभाष बराला यांना हरियाणातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांना उत्तराखंडमधून राज्यसभेचे उमेदवार केले आहे. याशिवाय, बिहार भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरमशीला गुप्ता यांनाही उमेदवारी दिली आहे. पक्षाने नितीश कुमार यांचे माजी सहकारी भीम सिंह यांनाही उमेदवारी दिली आहे.
BJP announces its candidates from Bihar, Chhattisgarh, Haryana, Karnataka, Uttar Pradesh, Uttarakhand and West Bengal for the forthcoming Rajya Sabha elections.
— ANI (@ANI) February 11, 2024
Sudhanshu Trivedi, RPN Singh from Uttar Pradesh.
Former Haryana BJP chief Subhash Barala announced as the party's… pic.twitter.com/jIuoBoQOys
पाहा यादी:
- धर्मशीला गुप्ता (बिहार)
- डॉ. भीम सिंह (बिहार)
- राजा देंवेंद्र प्रताप सिंह (छत्तीसगड)
- सुभाष बराला (हरियाणा)
- नारायाणा कृष्णासा भांडगे (कर्नाटक)
- आरपीएन सिंह (यूपी)
- डॉ. सुधांशु त्रिवेदी (यूपी)
- चौधरी तेजवीर सिंह (यूपी)
- साधना सिंह (यूपी)
- अमरपाल मौर्य (यूपी)
- संगीता बलवंत (यूपी)
- नवीन जैन (यूपी)
- महेंद्र भट्ट (उत्तराखंड)
- समिक भट्टाचार्य (पश्चिम बंगाल)
उत्तर प्रदेशात 7 जागांवर निवडणूक, दोन महिलांना संधी
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. या सात उमेदवारांपैकी दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने साधना सिंह आणि डॉ.संगीता बलवंत यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरण आणि नारी शक्ती वंदन कायद्याशीही या यादीचा संबंध जोडला जात आहे.
टीएमसीनेही उमेदवार जाहीर केले
आजचं तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने पत्रकार सागरिका घोष, नदीमुल हक ,सुष्मिता देव आणि ममता बाला ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.
किती जागांवर निवडणूक
या वर्षी राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. यापैकी 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला पूर्ण झाला आहे, तर आणखी 65 सदस्य निवृत्त व्हायचे आहेत. या 65 सदस्यांपैकी 55 सदस्य 23 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर राज्यसभेच्या ७ खासदारांचा कार्यकाळ 2 ते 3 एप्रिल दरम्यान पूर्ण होणार असून 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.
भाजपचे 32 खासदार निवृत्त होत आहेत
निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. यंदा भाजपच्या 32 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानंतर काँग्रेसचे 11 खासदार निवृत्त होणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे 4 आणि बीआरएसच्या 3 खासदारांचा समावेश आहे. याशिवाय जेडीयू, बीजेडी आणि आरजेडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त होत आहेत. एनसीपी, सपा, शिवसेना, टीडीपी, वायएसआरसीपी, एसडीएफ, सीपीआय, सीपीआयएम आणि केरळ काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार या वर्षी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील.