Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत ४१ उमेदवार बिनविरोध विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:08 AM2022-06-11T07:08:14+5:302022-06-11T07:08:32+5:30
Rajya Sabha Election: चार राज्यातील १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. ज्या ४१ जागांवर बिनविरोध निवड झाली त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांसह बिहार, छत्तीसगडसह ११ राज्यांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : १५ राज्यांत ५७ जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ४१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. चार राज्यातील १६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली. ज्या ४१ जागांवर बिनविरोध निवड झाली त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ११ जागांसह बिहार, छत्तीसगडसह ११ राज्यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात बिनविरोध निवडून आलेल्या ११ पैकी आठ जागांवर भाजप, तर ३ जागांवर सपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे लक्ष्मीकांत बाजपेयी, डॉ. राधामोहन दास अग्रवाल, दर्शना सिंह, संगीता यादव, बाबूराम निषाद, सुरेंद्र कुमार नागर, डॉ. के. लक्ष्मण व मिथिलेश कुमार यांचा समावेश आहे. तर, सपाचे जावेद अली, कपिल सिब्बल आणि रालोदचे जयंत चौधरी यांचा समावेश आहे.
बिहार : बिहारमधून पाच जागांवर झालेल्या बिनविरोध निवडणुकीत भाजपचे २, राजदचे २ आणि जदयूचा एक उमेदवार विजयी झाला. भाजपचे सतीशचंद्र दुबे, शंभू शरण पटेल, जदयूचे खीरू महतो, राजदकडून मीसा भारती, फैयाज अहमद यांचा समावेश आहे.
तामिळनाडू : तामिळनाडूतून ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यात सत्ताधारी डीएमकेचे ३, अण्णाद्रमुकचे २ आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. डीएमकेचे एस. कल्याणसुंदरम, आर. गिरिराजन, केआरएन राजेश कुमार, अण्णाद्रमुकचे सी.व्ही. शनमुगम आणि आ. धर्मर व काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा समावेश आहे.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील चारही जागांवर सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या उमेदवारात व्ही. विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णैया आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे दोन, तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झालेला आहे. भाजपकडून कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मीकी तर, काँग्रेसकडून विवेक तन्खा बिनविरोध विजयी झाले आहेत.
ओडिशा : ओडिशाच्या तीनही जागांवर बीजदचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात सुलाता देव, मानस रंजन मंगराज आणि सस्मित पात्रा यांचा समावेश आहे.
तेलंगणा : तेलंगणातून टीआरएसचे के. बी. पार्थसारथी रेड्डी आणि डी. दामोदर राव बिनविरोध विजयी झाले आहेत.
छत्तीसगड : छत्तीसगडमधून दोन्ही जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. राजीव शुक्ला आणि रंजित रंजन बिनविरोध निवडून आले आहेत.
झारखंड : झारखंडमधून एक जागा झामुमोला तर एक जागा भाजपला मिळाली आहे. भाजपचे आदित्य
साहू, तर झामुमोचे महुआ माजी विजयी झाले आहेत.
पंजाब : पंजाबमधील दोन्ही जागा आपला मिळाल्या आहेत. बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी हे बिनविरोध निवडून आले आहेत.
उत्तराखंड : उत्तराखंडची एकमेव जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे. भाजपच्या डॉ. कल्पना सैनी बिनविरोध निवडून आल्या आहेत.