Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी वापरलं जातं खास पेन, अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:38 PM2022-06-08T16:38:17+5:302022-06-08T16:38:56+5:30
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान हे इतर मतदानाप्रमाणे नसतं. तर त्यासाठी खूप काळजीपूर्वक मतदान करावं लागतं. या निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणारं पेन हे विशिष्ट्य प्रकारचं असतं. हे पेन तयार करणारी कंपनी ते केवळ निवडणुकीसाठीच पेन बनवते.
नवी दिल्ली - बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रात राज्यसभेसाठी मतदान घ्यावं लागणार असल्याने या निवडणुकीसाठीची चुरस वाढली आहे. राज्यातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार उतरल्याने सहाव्या जागेसाठी उमेदवार देणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेने आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान हे इतर मतदानाप्रमाणे नसतं. तर त्यासाठी खूप काळजीपूर्वक मतदान करावं लागतं. या मतदान प्रक्रियेमध्ये थोडीशी जरी चूक झाली तर जय पराजयाचं चित्र बदलू शकतं. या निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणारं पेन हे विशिष्ट्य प्रकारचं असतं. हे पेन तयार करणारी कंपनी ते केवळ निवडणुकीसाठीच पेन बनवते.
राज्यसभा निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर केला जातो. मात्र यामध्ये शिक्क्याचा वापर केला जात नाही. तर मतदान करण्यासाठी एका विशिष्ट्य प्रकारच्या पेनाचा वापर भारतीय निवडणूक आयोगाकडून केला जातो. राज्यसभा निवडणुकीच्या प्रकियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीसाठीचं खास पेन हे म्हैसूरमधील एक कंपनी तयार करते. हे पेन केवळ राज्यसभा निवडणुकीसाठीच वापरले जाते. सर्वसामान्यांसाठी हे पेन तयार केले जात नाही. एवढंच नाही तर ज्या राज्यामध्ये राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होतं. तिथे निवडणूक आयोगाकडून ठरावीक संख्येमध्येच पेन पाठवले जातात.
मतदान आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पेन पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे पाठवले जातात. या पेनामधील शाई ही Violet Colour ची असते. ही शाई जेलच्या रूपात असते. हे पेन स्केचप्रमाणे काम करते. राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यसभा निवडणुकीमध्ये पेनशी संबंधित तक्रारी आणि वाद झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी हे पेन पाठवण्यास सुरुवात केली आहे.