राज्यसभा निवडणुकीत भाजपचा 'नो-रिपीट फॉर्म्युला'; अनेक दिग्गजांचे तिकीट कापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:14 PM2020-03-12T16:14:49+5:302020-03-12T16:27:20+5:30
भाजपकडून गुजरातमधील 2, महाराष्ट्रातील 2 आणि आसाममधील 2 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.
नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी आपल्या 11 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये 9 नावे भाजप नेत्यांची आणि 2 नावे एनडीए मित्रपक्षांच्या नेत्यांची आहेत. तर राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांची तिकिट नो-रिपीट फॉर्म्युलाखाली कापली असून, त्यांच्या जागी नवीन चेहरे राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपकडून गुजरातमधील 2, महाराष्ट्रातील 2 आणि आसाममधील 2 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, मणिपूर आणि राजस्थानमधून एका उमेदवाराचे नावे जाहीर केले आहे. मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे आणि गुजरातमधून अॅडव्होकेट अभय भारद्वाज या नेत्यांची नेमणूक भाजपने केली आहे. यासह भाजपने महाराष्ट्रातील एनडीएचे सहयोगी आरपीई (ए) चे रामदास आठवले आणि आसाममधून बोडोलँड पीपल्स फ्रंटचे बिस्वजीत डाईमरी यांना उमेदवारी दिली आहे.
या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून, जवळपास सर्वच जागांवर नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्यावेळी उमेदवारी दिलेल्या नेत्यांना यावेळी नारळ देण्यात आला आहे. तर यात अनेक दिग्गज नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडून नो-रिपीटचा फॉर्म्युला राबवण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 7 जागा रिक्त आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन, काँग्रेस, शिवसेना,भाजप, रिपब्लिक पार्टी आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा आहे. तर रामदास आठवले आणि अमरशंकर साबळे हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे सदस्य आहेत. भाजपने रामदास आठवले यांना यावेळी पुन्हा उमेदवारी दिली आहे, परंतु अमर शंकर साबळे यांचे तिकीट कापले असून त्यांच्या जागी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपने तिसर्या जागेवर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेचे उमेदवार दिली आहे.