भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, या नेत्यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:20 PM2023-07-12T14:20:27+5:302023-07-12T14:21:36+5:30
Rajya Sabha Election Candidates: गुजरातमधील उमेदवारांचा विजय पक्का, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठी संधी.
BJP Rajya Sabha Election Candidates: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत गुजरात आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पश्चिम बंगालमधून अनंत महाराज तर गुजरातमधून बाबूभाई देसाई आणि केसरीदेव सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
24 जुलै रोजी राज्यसभेची निवडणूक
गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील एका जागेचा समावेश आहे.
कोण आहेत अनंत महाराज?
अनंत महाराज हे राजवंशी समाजातील प्रभावी आहे. ते बंगालमधील अनुसूचित जाती (SC) मधून येतात. उत्तर बंगालमध्ये या समुदायाचे सुमारे 30 टक्के मतदार आहेत, जे 54 विधानसभा जागांवर निर्णायक भूमिका बजावतात. पश्चिम बंगालमधील कूचबिहार, दिनाजपूर आणि जलपाईगुडी जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे. अनंत महाराज हे ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
भाजपला मोठी संधी
पश्चिम बंगालमधील 6 जागांपैकी 5 जागांवर टीएमसीचा तर एका जागेवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. जर भाजपचा उमेदवार विजयी झाला तर पश्चिम बंगालमधून भाजपचा नेता राज्यसभेवर निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असेल.
गुजरातमधील तीन उमेदवार
दुसरीकडे, गुजरातमधील भाजपचे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची खात्री आहे. बाबूभाई हे माजी आमदार आहेत. द्वारकाधीश मंदिराच्या मुख्य देणगीदारांपैकी ते एक आहेत. तर केसरीदेव सिंग हे सौराष्ट्रातील वांकानेरच्या राजघराण्यातील आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.