Rajya Sabha Elections 2018: उत्तर प्रदेशात भाजपा 9 जागांवर विजयी; तर सपाला 1 जागा; बसपाला पराभवाचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 08:57 PM2018-03-23T20:57:49+5:302018-03-23T22:48:11+5:30
यानिमित्ताने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यात अप्रत्यक्ष लढत रंगल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली: राज्यसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून एकूण ५९ जागांसाठी आज मतदान झाले होते. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणूक सर्वाधिक रंगतदार ठरली. गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र येत भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे आज राज्यसभेतही असा अनपेक्षित निकाल पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, भाजपाने 9 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली, तर एका जागेवर सपाचा उमेदवार विजयी झाला. तर बसपाचे उमेदवार भीमराव आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला.
भाजपाच्या अनिल अग्रवाल यांनी बसपा उमेदवार भीमराव आंबेडकरांचा पराभव केला. अनिल अग्रवाल यांना पहिल्या पसंतीची १६ मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्यांनी आंबेडकरांचा पराभव केला. बीआर आंबेडकरांना ३२ मते मिळाली. समाजवादी पार्टीकडून जया बच्चन ३८ मते मिळवून निवडून आल्या. भाजपाच्या अन्य आठ उमेदवारांना ३८ मते मिळाली. राज्यभेतील या विजयाने भाजपाने नुकत्या झालेल्या पोटनिवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली अशी भावना भाजपा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
तत्पूर्वी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने क्रॉस व्होटिंगची तक्रार केल्यानंतर आयोगाने मतमोजणी न करण्याचे आदेश दिले होते. बसपाच्या एका आमदाराने भाजपला मतदान केल्याचा दावा केला आहे. सपाने नितीन अग्रवाल यांचे आणि बसपाने अनिल सिंह यांचं मत अवैध ठरवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या दोन आमदारांनी आपली मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवली नसल्याचा आरोप होता. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली होती.
ठळक घडामोडी
9 clear hai: Anil Jain, BJP when asked about #RajySabhaElections results #UttarPradeshpic.twitter.com/YhUBWgWiIZ
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
* राज्यसभा निवडणूक २०१८: उत्तर प्रदेशमधून भाजपचे जी. व्ही. एल. नरसिंह राव विजयी.
* राज्यसभा निवडणूक २०१८: भाजपचे अनिल जैन उत्तर प्रदेशमधून विजयी.