Rajya Sabha Elections: गाण्याच्या भेंड्या, वेब सीरिज अन् मॅजिक शो... रिसॉर्टमध्ये आमदारांचा राजेशाही थाट, सारंकाही 'खुर्ची'साठी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:14 PM2022-06-08T13:14:12+5:302022-06-08T13:15:23+5:30
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी १० जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी आता 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची खूप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये एकेक जागेसाठी 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी १० जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी आता 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची खूप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये एकेक जागेसाठी 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मतालाही चांगला भाव आला आहे. यातच प्रत्येक पक्ष आपले आमदार राखण्यासाठी त्यांना पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टवर ठेवण्याची लगबग करत आहे.
पंचतारांकित हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेल्या आमदारांना अगदी राजेशाही सुविधा दिल्या जात आहेत. आमदारांच्या विरंगुळ्यासाठी पूल स्प्लॅश, महागडे गेम्स, मॅजिक शो अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदारांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. राजस्थान काँग्रेसचे आमदार २ जूनपासून उदयपूरच्या ताज अरावली रिसॉर्ट आणि स्पामध्ये वास्तव्याला आहेत.
अबब! राज्यसभेची १ जागा अन् कोट्यवधी पणाला; पंचतारांकित हॉटेलचा खर्च तरी पाहा
पक्षाचे आमदार हॉटेलमध्येच वाढदिवस साजरा करत आहेत. सिनेमे पाहात आहेत. तर विरंगुळ्यासाठी अगदी गाण्याच्या भेंड्याही खेळत आहेत. रिसॉर्टमधील काही फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह यांच्यासोबत मॅजिक शोचा आनंद घेत असल्याचं दिसून आलं आहे. काही आमदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असल्याचेही काही व्हिडिओ समोर आले आहेत. काही आमदार आपली गाण्याची आवड पूर्ण करताना दिसले तर काही पूलमध्ये पहुडताना दिसले.
भाजपा आमदारांबाबत बोलायचं झालं तर त्यांना उदयपूरच्या देवी रत्न हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार ६ ते ९ जूनमध्ये आमदारांना पक्षाची विचारधारा, मिशन २०२३ आणि मोदी सरकारच्या ८ वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित १२ सेशनला हजेरी लावण्यास सांगण्यात आलं आहे. दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत आमदारांना राज्यसभेत मदतान करण्यासाठीचं ट्रेनिंग देखील दिलं जात आहे.
महाराष्ट्रात आमदारांना 'पंचतारांकित' सेवा
राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर भाजपा आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसनंही आपल्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केलं आहे. आमदारांच्या सुविधेसाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
छत्तीसगडमध्येही आमदारांचा 'रॉयल' कारभार
छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या मेफेयर लेक रिसॉर्टमध्येही तिच परिस्थिती आहे. या हॉटेलमध्ये काँग्रेसनं हरियाणातील आमदारांना ठेवलं आहे. काँग्रेसचे आमदार २ जून रोजी चार्टर्ड फ्लाइटनं दिल्लीहून रायपूरला या रिसॉर्टवर पोहोचले. १० जून रोजी हेच आमदार चंडीगडसाठी रवाना होतील.