प्रफुल्ल पटेलांच्या राजीनान्यानंतर रिक्त जागेसाठी महाराष्ट्रात २५ जूनला राज्यसभेची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:28 AM2024-06-05T10:28:20+5:302024-06-05T10:36:48+5:30
Praful Patel, Rajya Sabha Election 2024: अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ती जागा रिक्त
Rajya Sabha Election 2024, Praful Patel: केरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी २५ जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. एका निवेदनात, निवडणूक पॅनेलने म्हटले की केरळमधील तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तेथील विद्यमान खासदार एलराम करीम, बिनॉय विस्वम आणि जोस के मणी हे तिघेही १ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. याशिवाय, वरिष्ठ सभागृहात पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेचा सामना करत असताना पटेल यांना राज्यसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे केले होते. त्यात ते जिंकले आणि त्यांना राज्यसभेची जागा मिळाली. त्यामुळे आता त्यांच्या जागी रिक्त पदावर कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. तसेच सध्या ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, ते पाहता पुढील गणिते कशी असतील हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.
मे २०२७ पर्यंत त्यांचा कार्यकाळ बाकी असतानाही तांत्रिक कारण पुढे करून पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. "मला राज्यसभेची उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागी अन्य कुणाला संधी मिळेल. त्यामुळे फार अफवा पसरवण्याची गरज नाही. ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतायेत त्या आम्हाला वाटत नाही. अनेक गोष्टी भविष्यात समोर येतील," असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले राजीनामा देताना केले होते.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जून आणि नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख १८ जून असणार आहे. २५ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत निवडणुका होतील. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल.