राज्यसभा निवडणूक: भाजपला मिळू शकतात ५७ पैकी २० जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 08:19 AM2022-05-22T08:19:02+5:302022-05-22T08:19:32+5:30
सध्या राज्यसभेत भाजपचे ९५ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर ही संख्या ९६ होईल. याशिवाय राष्ट्रपती ७ खासदारांची नेमणूक करणार आहेत.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : १५ राज्यांतील ५७ राज्यसभा जागांसाठी १० जून रोजी हाेणार असलेल्या निवडणुकीचे आपले उमेदवार ठरविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पुढील आठवड्यात दिल्लीत होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या निवडणुकीत भाजपला २० जागा जिंकता येऊ शकतात. मात्र, भाजपचे १९ राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्यामुळे त्यांना केवळ एकाच जागेचा लाभ होताना दिसत आहे.
सध्या राज्यसभेत भाजपचे ९५ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर ही संख्या ९६ होईल. याशिवाय राष्ट्रपती ७ खासदारांची नेमणूक करणार आहेत. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास पक्षाचे राज्यसभेतील संख्याबळ १०० च्या वर जाईल. भाजपचे उमेदवार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंग आणि आणखी दोन नेते यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि निर्मला सीतारामन यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे.