राज्यसभेसाठी ‘आप’मध्ये मैं.. मैं..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:16 AM2017-12-30T04:16:19+5:302017-12-30T04:16:28+5:30
नवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेत नामवंतांना संधी देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रयत्न फसत असल्याचे चित्र आहे. तीन जागांसाठीच अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. सेवानिवृत्त सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती, नोबेल पुरस्काराने सन्मानित कैलाश सत्यार्थी यांना ‘आप’च्या वतीने राज्यसभेत पाठवायची केजरीवाल यांची खूप इच्छा होती, असे समजते.
राज्यसभेच्या येत्या १६ जानेवारी रोजी होणाºया द्वैवार्षिक निवडणुकांत ‘आप’ला तिन्ही जागा जिंकता येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही केजरीवाल यांनी ही संधी देऊ केली होती, परंतु राजन यांनी शिकागो विद्यापीठातील शिकवण्याचे पूर्णवेळचे काम सोडण्याचा विचार नसल्याचे सांगून नकार दिला होता.
‘आप’च्या विधि शाखेचे प्रमुख गोपाल सुब्रमणियम आणि यशवंत सिन्हा व अरुण शौरी हे माजी केंद्रीय मंत्री यांच्याही नावांचा उल्लेख झाला आहे. सिन्हा हे नुकतेच एका कार्यक्रमात केजरीवाल यांच्यासोबत व्यासपीठावर होते व त्यांनी केजरीवालांचे भरपूर कौतुकही केले होते. आपच्या सुरुवातीच्या वर्षांतील सहानुभूतीदार उद्योगपती राजीव बजाज आणि सुनील मुंजाळ यांच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे, असे कळते. परंतु त्यांनी आम्हाला राजकीय भूमिकेत शिरायचे नाही, असे स्पष्ट केले.
राज्यसभेत संधी मिळण्यासाठी पक्षातील बंडाला केजरीवाल तोंड देत आहेत. ‘आप’चे संस्थापक कुमार विश्वास यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या कार्यालयापाशी चार तास धरणे धरले.
आशुतोष, संजय सिंह आणि आशिष खेतान आदी वरिष्ठ नेत्यांचेही प्रयत्न आहेत. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी केजरीवाल पक्षाचा पाया व्यापक करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी ‘आप’ला चार राज्यांत सहा
टक्के मते मिळवावी लागतील
किंवा तीन राज्यांत लोकसभेच्या ११ जागा जिंकाव्या लागतील. चार राज्यांत सहा टक्के मते मिळवण्यासाठी ‘आप’ राज्याराज्यांत निवडणूक लढवत आहे.
>पुढील आठवड्यात होणार नावे निश्चित
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरपासून भरता येतील व पाच जानेवारी हा त्याचा शेवटचा दिवस आहे. ‘आप’ची राजकीय व्यवहार समिती पुढील आठवड्यात पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करील. चर्चा अशीही
आहे की केजरीवाल हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासाठी स्वत:च राज्यसभेत जातील व दिल्लीची सूत्रे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडे देतील. काँग्रेसचे तीन खासदार जनार्दन द्विवेदी, परवेझ हाशमी आणि डॉ. करण सिंह यांचा कार्यकाळ २७ जानेवारी रोजी संपत आहे आणि ‘आप’कडे दिल्ली विधानसभेत ६६ आमदार असल्यामुळे त्याला तीन जागा जिंकता येणार आहेत.