राज्यसभा सदस्य इलैयाराजांना करावा लागला जातीयवादाचा सामना, पुजाऱ्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:23 IST2024-12-16T12:17:30+5:302024-12-16T12:23:03+5:30
इलैयाराजा यांनी प्रसिद्ध श्रीविल्लिपुथूर अंदाल मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागातर्फे करण्यात आले.

राज्यसभा सदस्य इलैयाराजांना करावा लागला जातीयवादाचा सामना, पुजाऱ्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखलं
राज्यसभा खासदार तथा संगितकार इलैयाराजा यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. त्यांना तामिळनाडूतील श्रीविल्लिपुथूर येथील आंदल मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखण्यात आल्याचे बोलले जात आहे. इलैयाराजा हे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले संगीतकार आहेत. त्यांचा जन्म 3 जून 1943 रोजी तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात एका दलित कुटुंबात झाला होता.
काय आहे प्रकरण -
इलैयाराजा यांनी प्रसिद्ध श्रीविल्लिपुथूर अंदाल मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागातर्फे करण्यात आले. मात्र ज्यावेळी त्यांनी अंदाल मंदिराच्या गर्भगृहात (मंदिराचा गाभारा) जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कथितपणे मंदिराचे अधिकारी आणि भक्तांनी त्यांना रोखले. प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचा हवाला देताना त्यांनी कथितपणे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर इलैयाराजा यांनी अर्थ मंडपमच्या बाहेरून प्रार्थना केली. यावेळी पुजाऱ्यांनी त्यांना हार घालून सन्मानित केले.
7000 हून अधिक गाणी -
इलैयाराजा हे आपल्या संगितासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी प्रामुख्याने दक्षिण भारतीय भाषांमदील चित्रपटांना संगित दिले आहे. त्यांनी 7000 हून अधिक गिती रचली आहेत. याशिवाय त्यांनी वीस हजारहून अधिक कान्सर्टमध्येही भाग घेतला आहे. त्यांना "इसैज्ञानी" (संगीत ज्ञानी) म्हणूनही ओळखले जाते.
मिळाले आहेत अनेक मोठे पुरस्कार -
इलैयाराजा यांना शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण देऊनही गौरवण्यात आले आहे. 2012 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकमधून शास्त्रीय गिटार वादनात सुवर्णपदक मिळाले आहे.