राज्यसभेसाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग!
By admin | Published: June 13, 2016 05:47 AM2016-06-13T05:47:43+5:302016-06-13T05:47:43+5:30
हरियाणात शनिवारी राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, पक्षातर्फे सोमवारी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार
नवी दिल्ली : हरियाणात शनिवारी राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा
आरोप काँग्रेसने केला असून, पक्षातर्फे सोमवारी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. राज्यात काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार आर.के. आनंद यांना पराभव पत्करावा लागला.
पक्षाचे सरचिटणीस बी.के. हरिप्रसाद यांनी सांगितले की, उद्या निवडणूक आयोगासमोर हरियाणातील दोन जागांसाठी झालेली निवडणूक रद्द करण्याची मागणी केली जाईल. निवडणुकीत माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डांसह आपल्याच लोकांनी धोका दिल्याबाबत आरोपांचे हरिप्रसाद यांनी खंडन केले. (वृत्तसंस्था)
>मोठे कारस्थान
हरियाणात काँग्रेसच्या १४ आमदारांची मते अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे आनंद यांचा पराभव झाला. दुसरीकडे हुड्डा यांनी यामागे फार मोठे कारस्थान असून, सत्य उघडकीस आले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
चंदीगड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मतदानासाठी ज्या पेनचा वापर झाला, त्याचीही न्यायवैद्यक चाचणी करण्याची मागणी केली आहे.
ते म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या कारस्थानाची कधीही कल्पना केली नव्हती. भाजपासमर्थित उमेदवार सुभाष चंद्रा यांच्या विजयासाठी हा कट रचण्यात आला.’