अमर सिंहांच्या 'या' विधानांनी देशाच्या राजकारणात घडवला भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 20:52 IST2020-08-01T20:43:05+5:302020-08-01T20:52:14+5:30
प्रदीर्घ आजारामुळे खासदार अमर सिंह यांचं सिंगापूरमध्ये निधन; ६४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

अमर सिंहांच्या 'या' विधानांनी देशाच्या राजकारणात घडवला भूकंप
राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहे. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी अमर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. सगळ्याच पक्षात उत्तम संबंध असणारे अमर सिंह समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे उजवे हात मानले जायचे. केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचं सरकार असताना सिंह यांचं नाव कायम चर्चेत असायचं. अनेक वादग्रस्त विधानांमुळे सिंह कायम चर्चेत राहिले.
अमिताभ बच्चन, पद्मविभूषण आणि अमर सिंह
अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण देणं म्हणजे दिलीप कुमार यांचा अपमान असल्याचं अमर सिंह म्हणाले होते. एका म्युझिक अल्बमच्या लॉन्चिंगवेळी सिंह यांनी हे विधान केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत. त्यांचं नाव पनामा पेपर्स प्रकरणातही आलेलं आहे, असं सिंह यांनी म्हटलं होतं.
जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान
२०१६ मध्ये गोमांसाचा विषय चर्चेत होता. त्यावेळी जया बच्चन यांनी गोमांस खाल्लं असल्याचं सिंह म्हणाले होते. कोण काय परिधान करतं, काय खातं, यावरून वाद आणि हत्या व्हायला नकोत. एक शिष्टमंडळ ग्लास्गोला गेलं होतं. त्यात जया बच्चनदेखील होत्या. तिकडे सगळ्यांनी गाय आणि डुकराचं मांस खाल्ल होतं. ब्रिटिश लोकांसाठी गाय, डुक्कर म्हणजे पोर्क आणि बीफ असतं, असं सिंह म्हणाले होते.
आजम खान यांच्यासोबत विळ्या भोपळ्याचं नातं
अमर सिंह आणि आजम खान यांच्यातून विस्तवही जायचा नाही. अमर सिंह यांनी काही वर्षांपूर्वी आजम खान यांच्यावर कडाडून टीका केली होती. आजम खान यांच्याविरोधात ईश-निंदाची केस चालवायला हवी. त्यांना तुरुंगात टाकायला हवं. त्यांना देश का सहन करतो, हे कळत नाही, अशा शब्दांत त्यांनी आजम खान यांना लक्ष्य केलं होतं.
यूपीए सरकार वाचवण्यासाठी अमर सिंह यांचा पुढाकार
अणर सिंह यांना २००९ मध्ये समाजवादी पक्षातून काढून टाकण्यात आलं. २०११ मध्ये त्यांना 'कॅश फॉर व्होट' प्रकरणात अटक करण्यात आली. यूपीए सरकार वाचवण्यासाठी खासदारांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अमेरिकेसोबतच्या अणू करारावरून डाव्यांनी काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढला. त्यामुळे लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. त्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार वाचवण्यासाठी अमर सिंह यांनी पुढाकार घेतला होता.