देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:26 AM2019-06-25T04:26:42+5:302019-06-25T04:27:00+5:30
देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली - देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
भाजपचे अशोक वाजपेयी म्हणाले की, नीती आयोगाने त्याच्या अहवालात पुढील वर्षी देशाच्या काही भागांत पाणीटंचाई असेल, असे म्हटले आहे. भाजपचे सरोज पांडे यांनी जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यावर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू म्हणाले, लक्षवेधी सूचना दिली गेल्यास या विषयावर मी चर्चेला परवानगी देईन.
सदस्यांनी आपापसांत चर्चा करून अशी नोटीस देण्याचा सल्लाही नायडू यांनी दिला. काँग्रेसचे टी. सुब्बरामी रेड्डी यांनी वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करून येत्या काही वर्षांत भारत लोकसंख्येत चीनलाही मागे टाकेल, असे म्हटले. कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन आणि काही सवलती काढून घेण्याची उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. वाढत्या लोकसंख्येने पर्यावरण, आर्थिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला असून, बेरोजगारी वाढत चालली आहे. प्रोत्साहन आणि सवलती काढून घेतल्याशिवाय लोकसंख्या नियंत्रण होणार नसल्याचे रेड्डी म्हणाले.
नद्या जोडण्याची मागणी
शून्य कालावधीत हा मुद्दा भाजपचे सत्यनारायण जतिया यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकच्या काही भागांनी परंपरागतरीत्या पाणीटंचाईला तोंड दिले आहे; पण ही टंचाई आता नव्या भागांतही पोहोचली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, असे सांगून जतिया यांनी पाच मोठ्या नद्या एकमेकींशी जोडण्याचा प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याची गरज व्यक्त केली.