राज्यसभेतील ज्येष्ठ लोकसभेच्या रिंगणात! राणे, यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 11:22 AM2023-06-15T11:22:44+5:302023-06-15T11:23:13+5:30
भाजपने अशी रणनीती आखण्याची ही पहिलीच वेळ नाही
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पुढील वर्षी मे महिन्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत काही केंद्रीय मंत्र्यांसह १२पेक्षा अधिक ज्येष्ठ नेत्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
आपल्या निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून ज्या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेची उमेदवारी द्यायची आहे, त्यांची नावे भाजप हायकमांडने निश्चित केल्याचे समजते. या यादीत धर्मेंद्र प्रधान (शिक्षण मंत्रालय), भूपेंद्र यादव (कामगार आणि पर्यावरण व वने मंत्रालय) आणि नारायण राणे (एमएसएमई मंत्रालय) यांची नावे याबाबत मागील काही काळापासून चर्चेत आहेत. राज्यसभेत ज्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण होत आहे, त्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे, असे दिसते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पक्षाच्या २००८पासूनच्या ज्येष्ठ नेत्या असून, त्यांना तामिळनाडूमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. परंतु परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अश्विनी वैष्णव (रेल्वे मंत्रालय) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याचे वृत्त मात्र खरे वाटत नाही. कारण, त्यांचा हा पहिलाच कार्यकाळ आहे.
भूपेंद्र यादव मूळचे हरयाणाचे असून, ते राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. हरयाणातील महेंद्रगडमधून त्यांना उमेदवारी दिल्यास त्याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार व मंत्री राव इंद्रजित सिंह यांच्यासमोर अडचणी उभ्या राहतील.
भाजपने अशी रणनीती आखण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४मध्ये भाजपने अरुण जेटली यांना अमृतसरमधून उमेदवारी दिली होती तर २०१९मध्ये केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांना याच मतदारसंघातून मैदानात उतरवले होते.
यांचा निर्णय नंतर...
सभागृहाचे नेते व वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया व पुरुषोत्तम रुपाला (पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्रालय) हे गुजरातचे असून, त्यांच्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाऊ शकतो. लोकसभेसाठी उतरवण्याची शक्यता असलेल्या राज्यसभेच्या इतर ज्येष्ठांमध्ये डॉ. के. लक्ष्मण, सुशीलकुमार मोदींचा समावेश.