राज्यसभा अधिवेशनाचे सूप वाजले, २५ विधेयके केली मंजूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:33 AM2020-09-24T03:33:26+5:302020-09-24T03:33:36+5:30
इतिहासात पहिल्यांदाच घडल्या काही गोष्टी -व्यंकय्या नायडू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यसभेचे सत्र ठरलेल्या अवधीच्या आठ दिवस आधीच गुंडाळण्यात आले. या कमी अवधीच्या सत्रात तब्बल २५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
या सत्रामध्ये कृषी विधेयकांवरून विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेयक शेतकरीविरोधी आणि काही ठराविक व्यापाऱ्यांच्या हिताचे असल्याचे आरोप करण्यात आले होते. गोंधळ घालून उपसभापतींचा माईक तोडण्याचा प्रयत्न करण्याच्या कारणावरून सभापती नायडू यांनी ८ सदस्यांना सत्र संपेपर्यंत निलंबित केले. त्यात विरोधी पक्षातील सदस्यांचा समावेश होता.
कामकाजावरील बहिष्कार खेदजनक
विरोधी सदस्यांनी दोन दिवसांपासून कामकाजावर बहिष्कार टाकला. याबाबत नायडू यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, अधिवेशन घेणे हे कायद्यानुसार बंधनकारक होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रातील लोक काम करीत असताना खासदारांवर जी जबाबदारी आहे ती पूर्ण पाडायला पाहिजे, असेही चर्चेत सांगितले होते. उपसभापतींना पदावरून हटवा, अशी मागणीही राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे. मी ही सूचना तात्काळ फेटाळली, कारण ही बाब नियमांना अनुरूप नव्हती.