मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राज्यसभेत गोंधळ
By admin | Published: April 29, 2015 12:01 AM2015-04-29T00:01:34+5:302015-04-29T00:01:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यामुळे भारताची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत, विरोधकांनी मंगळवारी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला.
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
चालू महिन्यातील विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यामुळे भारताची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत, विरोधकांनी मंगळवारी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या मुद्यावर चर्चेची मागणी काँग्रेससह विरोधकांनी लावून धरली. उपसभापतींनी ही मागणी फेटाळल्यामुळे आक्रमक काँग्रेस सदस्यांनी नारेबाजी केली. नारेबाजी करणाऱ्या या सदस्यांमध्ये राज्यसभा सदस्य विजय दर्डा आघाडीवर होते.
विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनच्या स्थगितीनंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
कॅनडाच्या दौऱ्यावर असताना मोदींनी भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात काही लोक घाण सोडून गेलेत, मी ती साफ करणार आहे. घोटाळ्यांचा देश ही ‘स्कॅम इंडिया’बदलून ‘स्किल इंडिया’ अशी देशाची नवी प्रतिमा घडवणार आहे.
मंगळवारी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यांवर नियम २६७ अंतर्गत कार्यस्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा करण्याची मागणी केली. अर्थात या मुद्यावर विविध पक्षांची बाजू ऐकल्यानंतर उपसभापती पी.जे. कुरियन यांनी शर्मा यांची कार्यस्थगन प्रस्तावाची नोटीस खारीज केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, शर्मा यांनी मोदींच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील वक्तव्ये देशाची प्रतिमा मलिन करणारी असल्याचा आरोप केला.
अन्य विरोधकांनीही त्यांना पाठिंबा दिला. परदेशात जाऊन आपल्या देशातील विरोधकांवर टीका करणे भारताची संस्कृती नाही. यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानाने अशी वक्तव्ये केलेली नाहीत, असे शर्मा म्हणाले. यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले.
जेटलींनी केला सरकारचा बचाव
४६० वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारापासून स्वत:ला वेगळे करण्याचा व आम्ही एक स्वच्छ व प्रामाणिक शासन देऊ हे म्हणण्याचा पंतप्रधानांना पूर्ण अधिकार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या विदेश दौऱ्यात भारतीय वंशाच्या लोकांसमक्ष बोलताना निर्णय प्रक्रिया स्वच्छ करण्याचे म्हटले होते. या मुद्यावर सभागृहात चर्चा होत असेल तर गत ६० वर्षांतील भ्रष्टाचारही चव्हाट्यावर येईल, असे जेटली म्हणाले.