राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक: राष्ट्रवादीच्या मराठमोळ्या नेत्या रिंगणात?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 05:27 PM2018-08-07T17:27:51+5:302018-08-07T17:28:49+5:30
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला राज्यसभेची उपसभापती बनणार असेल तर आपल्याला आनंदच होईल. मात्र अद्याप काही निश्चित झालेले नाही. विरोधी पक्षाच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे सध्या फार न बोलता काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल.
I would be very happy if any woman is elected as Deputy Chairman of Rajya Sabha, but nothing has been decided yet. Opposition meetings are going on, we should wait: Vandana Chavan,NCP MP on reports of her being opposition candidate for Rajya Sabha Deputy Chairman elections pic.twitter.com/uMo3TMr4YX
— ANI (@ANI) August 7, 2018
राज्यसभा उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यातच उपसभापतीपदाची निवडणूक जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का देण्याचा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचा मानस आहे.
दुसरीकडे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या उमेदवारासाठी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून पाठिंबा मागितला आहे. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.